शेतकऱ्यांना प्रोत्साहन अनुदानाची प्रतीक्षा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 19, 2021 10:18 AM2021-05-19T10:18:14+5:302021-05-19T10:18:20+5:30
Khamgaon News : तातडीने दोन लाखांपर्यंत कर्ज माफ करावे, अशी मागणी शेतकरी करत आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
खामगाव : राज्य शासनाने दोन लाखांपर्यंत कर्जमाफी व नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना ५० हजार रुपये प्रोत्साहन अनुदान देण्याची घोषणा केली होती. परंतु अद्यापही शेतकऱ्यांच्या खात्यावर प्रोत्साहन अनुदान प्राप्त झाले नसल्याने नाराजी व्यक्त होत आहे. शेतकऱ्यांना बँका नोटिसा पाठवत असल्याने तातडीने दोन लाखांपर्यंत कर्ज माफ करावे, अशी मागणी शेतकरी करत आहेत.
युती शासनाच्या काळात छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना सुरू करत शेतकऱ्यांना दीड लाखांपर्यंत कर्जमाफीची घोषणा करण्यात आली होती. त्यात अनेक नियम आणि अटी घालण्यात आल्या होत्या. यामुळे या योजनेतून अनेक शेतकरी वंचित राहिले होते. तर दुसरीकडे काहीच शेतकऱ्यांना याचा लाभ मिळाला होता.
यात १ एप्रिल २०१५ ते ३१ मार्च २०१९ पर्यंत थकीत पीक कर्जाबरोबरच शेती अवजारांसाठी घेतलेल्या कर्जाचा समावेश होता. शेतकरी कर्जमुक्त व्हावा या उद्देशाने सुरू करण्यात आलेल्या शेतकरी सन्मान योजनेतील प्रत्यक्ष नियम आणि अटींमुळे अनेक शेतकऱ्यांच्या सातबारा वरील बोजा कायम राहून पुन्हा कर्ज मिळण्यास अडचणी येत होत्या.
गेल्या दीड वर्षांपूर्वी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना घोषित केली होती.
यातून जिल्ह्यातील हजारो शेतकरी कर्जमुक्त झाले. याच दरम्यान मुख्यमंत्री ठाकरे यांनी नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना ५० हजार प्रोत्साहन अनुदान आणि दोन लाखांपर्यंत थकबाकी असलेल्या शेतकऱ्यांना कर्जमुक्त करण्याची घोषणा केली होती. खरीप हंगामाच्या तोंडावर जिल्ह्यातील विविध भागातील शेतकऱ्यांना राष्ट्रीयीकृत बँका, व्यापारी बँक, मध्यवर्ती सहकारी बँक, ग्रामीण बँक, विविध कार्यकारी सहकारी संस्था कर्ज वसुलीसाठी नोटिसा काढत आहेत.
यंदा कोरोनामुळे शेतमाल विक्रीत अडचणी आल्याने शेतकरी संकटात आहेत. यामुळे शासनाने केलेल्या दोन्ही घोषणांची तत्काळ अंमलबजावणी करण्यात यावी, अशी मागणी शेतकरी करत आहेत.