किडनी निकामी झालेल्या मुलीला मदतीची ‘प्रतीक्षा’
By admin | Published: July 12, 2014 12:05 AM2014-07-12T00:05:55+5:302014-07-12T00:16:09+5:30
खामगाव तालुक्यातील अंत्रज येथील चौदा वर्षीय प्रतीक्षाला मदतीची ‘प्रतीक्षा’
खामगाव : किडनीचा आजार जडलेल्या चौदा वर्षीय प्रतीक्षाला आपला आजार कधी बरा होईल, असा यक्ष प्रश्न पडला आहे. किडनीच्या आजाराचा ती धैर्याने सामना करीत आहे, तरी वडिलांची बेताची आर्थिक परिस्थिती तिच्या उपचाराच्या आड येत आहे. कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवावा की प्रतीक्षावर उपचार करावा, अशा द्विधा मनस्थितीत ते गुंतले आहेत.
खामगाव तालुक्यातील अंत्रज येथील संतोष चिंधकाजी कळसकार हे महसूल विभागांतर्गत तलाठी कार्यालय, अंत्रज येथे कोतवाल म्हणून कार्यरत आहेत. त्यांना महिन्याकाठी जेमतेम पाच हजार रुपये वेतन मिळते. अशाही परिस्थितीत आपल्या पाच सदस्य असलेल्या कुटुंबाचा गाडा ओढत अस तानाच अचानक त्यांच्या कुटुंबावर संकट कोसळले. त्यांच्या तीन पैकी एका मुलीला वर्षभरापूर्वी किडनीचा दुर्धर आजार जडला. डॉक्टरांनी किडनीचे प्रत्यारोपण हाच एकमेव पर्याय असल्याचा सल्ला दिला आहे. त्याकरिता चार लाख रुपये खर्च अपेक्षित आहे. दानदात्यांनी प्रतीक्षाच्या उपचारासाठी मदत करण्याचे आवाहन त्यांनी केले आहे.
**आजारावर खर्च होतात महिना चार हजार
अनुसूचित जाती-जमाती मागासवर्गीय मुलींची निवासी शाळा, घाटपुरी येथे राहून शिक्षण घेत होती; मात्र आजाराचा त्रास असह्य होत असल्याने इयत्ता नववीसाठी तिला गावातील महात्मा जोतिबा फुले विद्यालयात टाकण्यात आले आहे. तिची आई शोभाबाई घरकाम सांभाळून शेतीत मोलमजुरी करता त. यातून मिळणारी रक्कमही त्यांच्या परीने त्या प्रतीक्षाच्या उपचारावर खर्च करतात. तिच्यावर तत्काळ लक्ष देता यावे म्हणूनच तिला गावातील शाळेत टाकण्यात आले आहे.