कर्जमाफीच्या ‘ग्रीन’ यादीची प्रतीक्षाच!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 25, 2017 12:33 AM2017-10-25T00:33:59+5:302017-10-25T00:35:51+5:30

बुलडाणा: छत्रपती शिवाजी महाराज कृषी सन्मान योजना कर्जमाफीचे जिल्ह्यात २ लाख ५0 हजार ७४५ लाभार्थी कुटुंब असून, १८ ऑक्टोबरपासून कर्जमाफीची रक्कम बँक खात्यात जमा करण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले होते; मात्र अद्यापपर्यंत कर्जमाफीच्या लाभार्थींची यादी ‘प्रक्रिये’मध्येच अडकलेली  आहे.  कर्जमाफीच्या ‘ग्रीन’ यादीच्या या  गोलमालमुळे शेतकर्‍यांना आपले नाव लाभार्थी यादीत शोधता शोधता नाकीनऊ येत आहेत. 

Waiting for the list debt waiver! | कर्जमाफीच्या ‘ग्रीन’ यादीची प्रतीक्षाच!

कर्जमाफीच्या ‘ग्रीन’ यादीची प्रतीक्षाच!

Next
ठळक मुद्देजिल्ह्यात २ लाख ५0 हजार कुटुंब लाभार्थी लाभार्थींची यादी अडकली ‘प्रक्रिये’मध्ये

ब्रम्हानंद जाधव । 
लोकमत न्यूज नेटवर्क
बुलडाणा: छत्रपती शिवाजी महाराज कृषी सन्मान योजना कर्जमाफीचे जिल्ह्यात २ लाख ५0 हजार ७४५ लाभार्थी कुटुंब असून, १८ ऑक्टोबरपासून कर्जमाफीची रक्कम बँक खात्यात जमा करण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले होते; मात्र अद्यापपर्यंत कर्जमाफीच्या लाभार्थींची यादी ‘प्रक्रिये’मध्येच अडकलेली  आहे.  कर्जमाफीच्या ‘ग्रीन’ यादीच्या या  गोलमालमुळे शेतकर्‍यांना आपले नाव लाभार्थी यादीत शोधता शोधता नाकीनऊ येत आहेत. 
छत्रपती शिवाजी महाराज कृषी सन्मान योजनेंतर्गत १ एप्रिल २00९ नंतर पीक कर्ज व मध्यम मुदत कर्ज घेतलेले व ३0 जून २0१६   पर्यंत थकबाकीदार शेतकर्‍यांचे मुद्दल व व्याजासह  दीड लाख रुपयांपर्यंत कर्ज माफ करण्यात आलेले आहे. या योजनेंतर्गत जिल्ह्यात २२ सप्टेंबर या मुदतीपर्यंत कर्जमाफीचे ऑनलाइन ४ लाख ६७ हजार ४५७ शेतकर्‍यांनी नोंदणी केली.
 त्यामध्ये  जिल्ह्यातील २ लाख ५0 हजार ७४५ लाभार्थी कुटुंबांची संख्या आहे. यामध्ये शेतकर्‍यांकडून ऑनलाइन अर्ज भरल्यानंतर, अर्जांची छाननी व लेखा परीक्षण पूर्ण करण्यात आले. त्यानंतर ऑडिट केलेल्या अर्जांंच्या फायली शासनाकडे सादर करण्यात आल्या.
 यामध्ये जिल्हा राज्यात आघाडीवर असल्याचा गवगवा प्रशासनाकडून करण्यात आला. राज्यात १८ ऑक्टोबरपासून कर्जमाफीची रक्कम बँक खात्यात जमा करण्याची प्रक्रिया सुरू करण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले. त्यानुसार  दीड लाखापर्यंत कर्ज माफ झालेल्या शेतकर्‍यांना थेट मुख्यमंत्री यांच्या स्वाक्षरीचे ‘कर्ज बेबाक’ प्रमाणपत्र १८ ऑक्टोबर रोजी प्रत्येक जिल्ह्यात जिल्हाधिकारी कार्यालयात देण्यात आले.
 कर्जमाफीस पात्र शेतकर्‍यांच्या नावाची हिरवी (ग्रीन) यादी व कागदपत्रांमध्ये त्रुटी असलेल्या शेतकर्‍यांची पिवळी (येलो) आणि अपात्र शेतकर्‍यांची लाल (रेड) यादी छत्रपती शिवाजी महाराज कृषी सन्मान योजनेच्या संकेतस्थळावर व संबंधित बँकाकडे  देण्यात येणार होती; मात्र अद्यापपर्यंंत सदर यादी जाहीर करण्यात आली नाही. कर्जमाफीच्या लाभार्थींंची यादी अद्यापपर्यंंत प्रोसेसमध्येच अडकल्याने शेतकरी चिंतातुर झाले आहेत. 

प्रमाणपत्र मिळविलेले शेतकरी संभ्रमात
छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना २0१७ अंतर्गत प्रतिनिधिक स्वरूपात कर्जमाफी प्रमाणपत्र, साडी-चोळी, कुर्ता देऊन शेतकर्‍यांचा सन्मान कार्यक्रमाचे आयोजन १८ ऑक्टोबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन समिती सभागृहात करण्यात आले होते. यावेळी पालकमंत्री पांडुरंग फुंडकर यांच्या हस्ते प्रतिनिधिक स्वरूपात जिल्ह्यातील २१ शेतकरी कुटुंबाचा सन्मान करून मुख्यमंत्री यांच्या स्वाक्षरीचे ‘कर्ज बेबाक’ प्रमाणपत्र वितरित करण्यात आले; मात्र लाभार्थींंची यादीच अद्यापपर्यंंत समोर आली नसल्याने प्रमाणपत्र मिळविलेले शेतकरीसुद्धा कर्जमाफीच्या लाभापासून संभ्रमात आहेत. 

शेतकरी झिजवताहेत बँकाचे उंबरठे 
दिवाळीच्या मुहूर्तावर छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेंतर्गत पात्र शेतकर्‍यांना कर्जमाफीचा लाभ देण्याची प्रक्रिया सुरू करण्यात येणार होती; परंतु आतापर्यंंत जिल्ह्यातील एकाही शेतकर्‍याच्या बँक खात्यात कर्जमाफीचा लाभ जमा झाला नाही. त्यामुळे शेतकरी संबंधित बँकेचे उंबरठे झिवजत आहेत. शेतकरी कर्जमाफीचा लाभ पाहण्यासाठी दररोज बँकेत चकरा मारत आहेत. बँकेत विचारपूस केल्यानंतर कर्मचारीसुद्धा योग्य माहिती शेतकर्‍यांना देत नसल्याने बँक कर्मचारी आणि शेतकर्‍यांमध्ये वाद उद्भवत आहेत. 

छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेंतर्गत लाभार्थींंची यादी तयार करण्याची प्रक्रिया अद्याप सुरू आहे. लवकरच लाभार्थींंची यादी संबंधित बँकेकडे पाठवून लाभार्थी शेतकर्‍यांच्या बँक खात्यात कर्जमाफीचा लाभ जमा करण्यात येईल. 
- नानासाहेब चव्हाण,
जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था, बुलडाणा.
-

Web Title: Waiting for the list debt waiver!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.