३५ हजार क्विंटल तूर मोजमापाच्या प्रतीक्षेत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 26, 2017 01:15 AM2017-05-26T01:15:10+5:302017-05-26T01:15:10+5:30
महिनाभरात ७ हजार क्विंटल तुरीचे मोजमाप
लोकमत न्यूज नेटवर्क
शेगाव : येथील नाफेड केंद्राअंतर्गत सुरु असलेल्या तुरीच्या मोजमापाला वेग आलेला आहे. एका महिन्यात ७ हजार क्विंटल तुरीचे मोजमाप झाले असून टोकण देण्यात आलेल्या ३५ हजार ४३६ क्विंटल तूर मोजमापाच्या प्रतिक्षेत आहे.
नाफेडव्दारा येथील कृषी बाजार समितीच्या स्व.गजाननदादा पाटील यार्डात तुरीचे मोजमाप सुरु आहे. मागील काही दिवसात या केंद्रावर झालेल्या प्रकारामुळे प्रशासनाने या केंद्रांच्या प्रक्रियेत मोठे बदल घडवले असून शेतकऱ्यांना आधी टोकन वाटप व नंतर दूरध्वनीद्वारे बोलावून त्यांच्या तुरीचे मोजमाप होत असल्याने शेतकऱ्यांचाही त्रास वाचला आहे. शिवाय आर्थिक झळही कमी झाली आहे.
मात्र टोकन प्राप्त करून घेण्यासाठी बाजार समितीच्या कार्यालयात शेतकऱ्यांची होणारी गर्दी पाहता बाजार समितीने शेतकऱ्यांसाठी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था आणि उन्हापासून बचावासाठी मंडप उभारले आहे. सकाळी ११ वाजतापासून सायंकाळी ५ वाजेपर्यंत टोकन वाटपाची प्रक्रिया सुरु आहे. १५ मे ते २३ मार्चपर्यंत २ हजार ६२७ शेतकऱ्यांच्या ३५ हजार ४३६ क्विंटल तुरीला टोकन वाटप करण्यात आले आहे. तर यापैकी २३ मार्चपर्यंत ७ हजार २९१ क्विंटल तुरीचे मोजमाप झाले आहे अशी माहिती बाजार समितीकडून देण्यात आली आहे.