मागील पीक विम्याचीच प्रतीक्षा, आता नवीन काढावा की नाही?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 4, 2021 12:18 PM2021-07-04T12:18:52+5:302021-07-04T12:19:01+5:30
Crop insurance : जिल्ह्यात प्रधानमंत्री पीक विमा योजना खरीप हंगाम २०२१ साठी लागू करण्यात आली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
बुलडाणा : मागील वर्षी खरीप हंगामात पिकांचे नुकसान होऊनही शेतकऱ्यांना पीक विमा मिळाला नाही. मागील पीक विम्याचीच प्रतीक्षा असल्याने आता नवीन पीक विमा काढावा की नाही? असा प्रश्न शेतकऱ्यांमधून उपस्थित होत आहे. जिल्ह्यात प्रधानमंत्री पीक विमा योजना खरीप हंगाम २०२१ साठी लागू करण्यात आली आहे. या योजनेत शेतकऱ्यांना सहभागी होण्यासाठी १५ जुलैची मुदत देण्यात आली आहे.
पीक विमा योजनेकरीता खरीप ज्वारी, सोयाबीन, मुग, उडीद, तुर, कापूस व मका पिकांचा समावेश करण्यात आला आहे. शेतकऱ्यांना शेतमालाच्या अनिश्चित उत्पन्नाची नुकसान भरपाई सामुहिक स्वरूपात मिळावी, या उद्देशाने ही योजना जिल्ह्यात राबविण्यात येत आहे. खरीप हंगामातील अपुरा पाऊस, हवामानातील इतर घटकांच्या प्रतिकुल परिस्थितीमुळे केवळ अधिसुचित मुख्य पिकांची अधिसुचीत क्षेत्रात सर्वसाधारण क्षेत्राच्या ७५ टक्के पेक्षा जास्त क्षेत्रावर पेरणी, लावणी न झाल्यास विमा संरक्षण देय राहणार आहे.
सर्वसाधारण काढणीच्या १५ दिवस आधीपर्यंत पूर, पावसातील खंड, दुष्काळ, आदी बाबींमुळे शेतकऱ्यांच्या अपेक्षीत उत्पादनामध्ये सरासरी उत्पादनाच्या ५० टक्केपेक्षा जास्त घट अपेक्षित असेल, तर विमा संरक्षण देय राहणार आहे. टाळता न येणाऱ्या जोखमींमुळे पिकांच्या उत्पन्नात येणाऱ्या घटीपासून व्यापक विमा संरक्षण दिले जाते. अधिसुचीत विमा क्षेत्र घटकातील पीक कापणी प्रयोगावरून उपलब्ध झालेल्या सरासरी उत्पन्नाची तुलना उंबरठा उत्पन्नाशी करून नुकसान भरपाई निश्चित केली जाते. जर सरासरी उत्पन्न उंबरठा उत्पन्नपेक्षा कमी आले, तर नुकसान भरपाई देय असणार आहे.