बालदिनानिमित्त घेतलेल्या स्पर्धेतील बक्षिसांची प्रतीक्षा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 10, 2021 04:26 AM2021-01-10T04:26:41+5:302021-01-10T04:26:41+5:30
कोरोना विषाणू संसर्गामुळे शाळा बंद असल्याने शाळेतील विविध कार्यक्रम, स्पर्धा ऑनलाइन घेण्यात येत आहेत. १४ नोव्हेंबर हा बालदिनही ऑनलाइन ...
कोरोना विषाणू संसर्गामुळे शाळा बंद असल्याने शाळेतील विविध कार्यक्रम, स्पर्धा ऑनलाइन घेण्यात येत आहेत. १४ नोव्हेंबर हा बालदिनही ऑनलाइन साजरा करण्यात आला होता. जिल्ह्यातील सर्व शाळांमधील पहिली ते बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी ८ ते १४ नोव्हेंबर या कालावधीमध्ये वाचन, लेखन, वक्तृत्व स्पर्धा, पोस्टर स्पर्धा यांसह विविध ऑनलाइन स्पर्धा पार पडल्या. पंडित नेहरू यांच्या जन्मदिनानिमित्त ८ ते १४ नोव्हेंबर या कालावधीत बालदिन सप्ताह साजरा करण्यात आला. पहिली व दुसरीच्या विद्यार्थ्यांना ‘मी नेहरू बोलतोय’ या विषयावर तीन मिनिटांचा व्हिडिओ अपलोड करायचा होता. तिसरी ते पाचवीच्या विद्यार्थ्यांना पत्रलेखन हा विषय देण्यात आला होता. त्यामध्ये चाचा नेहरूंना पत्र लिहायचे होते. सहावी ते आठवीच्या विद्यार्थ्यांना कविता वाचन आणि नेहरूंच्या जीवनावर एकपात्री प्रयोग होता. नववी ते दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी स्वातंत्र्य संग्रामातील नेहरूंच्या जीवनावरील पोस्टर तयार करणे व निबंध स्पर्धा घेण्यात आली, असे ऑनलाइन उपक्रम शिक्षण विभागाकडून कळविण्यात आले. जिल्ह्यात या ऑनलाइन स्पर्धेला मुलांचा चांगला प्रतिसाद मिळाला. या स्पर्धेला दोन महिने होत असून, आतापर्यंत यशस्वी मुलांना बक्षिसांचे वाटप करण्यात आले नाही. यशस्वी विद्यार्थ्यांची निवड प्रक्रिया पूर्ण झाली आहे; परंतु त्यांना बक्षीस मिळालेले नाही. सर्व शिक्षा अभियानाच्या तरतुदीनुसार बक्षिसे देण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
बालदिनाच्या पार्श्वभूमीवर ८ ते १४ नोव्हेंबर या कालावधीमध्ये विद्यार्थ्यांच्या ऑनलाइन स्पर्धा पार पडल्या. तालुकास्तर, जिल्हास्तर व राज्य स्तरावर झालेल्या या स्पर्धेतील यशस्वी विद्यार्थ्यांचे नंबर काढण्यात आले आहेत. बक्षिसास पात्र विद्यार्थ्यांना शासनाच्या सुचनेनुसार बक्षिसे वाटप करण्यात येतील.
- उमेश जैन,
उपशिक्षणाधिकारी.
बक्षिसासाठी विलंब
बालदिन सप्ताहामध्ये घेण्यात आलेल्या ऑनलाइन स्पर्धेतील बक्षीस वितरणाला विलंब होत असल्याने विद्यार्थ्यांमध्ये नाराजी दिसून येत आहे.
पहिली ते बारावीच्या विद्यार्थ्यांचा या स्पर्धेला चांगला प्रतिसाद मिळाला होता; परंतु काही विद्यार्थ्यांचे व्हिडिओ ऑनलाइन संकेतस्थळावर अपलोड होऊ शकले नाहीत.