दुसरबीड परिसरात पावसाची प्रतीक्षा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 23, 2021 04:23 AM2021-06-23T04:23:08+5:302021-06-23T04:23:08+5:30
दुसरबीड : मृग नक्षत्राच्या सुरुवातीला चांगला पाऊस झाल्यामुळे शेतकऱ्यांनी खरिपाची पेरणी केली़; परंतु त्यानंतर पावसाने दांडी मारल्याने ...
दुसरबीड : मृग नक्षत्राच्या सुरुवातीला चांगला पाऊस झाल्यामुळे शेतकऱ्यांनी खरिपाची पेरणी केली़; परंतु त्यानंतर पावसाने दांडी मारल्याने शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट आले आहे. पावसाने उघडीप दिल्यामुळे जमिनीमध्ये पेरलेले बियाणे अंकुरलेच नाही़. पाऊस न आल्यास बियाणे खराब होण्याच्या मार्गावर असून, शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट घोंगावत आहे.
मागील वर्षामध्ये अतिवृष्टी झाल्यामुळे आलेले पीक हातातून गेले. थोड्याफार आलेल्या पिकाला भाव मिळाला नाही. लॉकडाऊनमुळे आलेल्या थोड्याफार पिकाची मनमानी भावाने खरेदी व्यापाऱ्यांनी केली़. बियाणांचे भाव आकाशाला भिडले आहेत. दुबार पेरणीकरिता बियाणे कसे आणायचे, अशा एक ना अनेक संकटांनी शेतकरी भांबावून गेला आहे. मागील हंगामामध्ये भरलेला पीक विमा नुकसान होऊनसुद्धा शेतकऱ्यांच्या पदरात पडला नाही़. पीकविमा मिळण्याबाबत घोषणा झाल्या़; परंतु त्या वाऱ्यात विरून गेल्या. कर्जमाफी न मिळाल्यामुळे अनेक शेतकरी कर्जात अडकून पडले़. बँकांमध्ये पीक कर्ज मिळण्यास कोणताही पर्याय नाही, अशा परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांनी पेरणी केली आहे़. त्यातच दुबार पेरणीचे संकट ओढवल्याने शेतकरी संकटात सापडले आहेत़. ऑनलाईन अर्ज करूनही अनेक शेतकऱ्यांना अनुदानित बियाणे मिळालेच नाही़. त्यामुळे बाजारातून चढ्या दराने बियाणे खरेदी करावे लागले़. काेणतीही कंपनी अथवा विक्रेते यांच्याकडून कोणत्याहीप्रकारची उगवणशक्तीचे हमी नसलेले बियाणे बाजारातून खरेदी करावे लागले़. त्यातच दुबार पेरणीचे संकट घाेंगावत असल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत़. शासनाने सर्वच शेतकऱ्यांना माेफत बियाणे देण्याची मागणी हाेत आहे़.