सहा हजार गॅस ग्राहक वेटिंगवर
By Admin | Published: September 3, 2014 12:03 AM2014-09-03T00:03:47+5:302014-09-03T00:03:47+5:30
गौरी गणपतीच्या दिवसात जिल्ह्यात गॅस सिलिंडरची तीव्र टंचाई निर्माण झाली असून सहा हजार ग्राहक वेटिंगवर आहेत. तुटवडा निर्माण झाल्याने गरजवंतांना काळ्या बाजारातून ८०० रुपये दराने सिलिंडर खरेदी करावे
सणासुदीचे दिवस : काळ्या बाजारात ८०० रुपये दराने विक्री
यवतमाळ : गौरी गणपतीच्या दिवसात जिल्ह्यात गॅस सिलिंडरची तीव्र टंचाई निर्माण झाली असून सहा हजार ग्राहक वेटिंगवर आहेत. तुटवडा निर्माण झाल्याने गरजवंतांना काळ्या बाजारातून ८०० रुपये दराने सिलिंडर खरेदी करावे लागत आहे. सणासुदीच्या दिवसात ग्राहकांना गॅससाठी एजन्सीपुढे रांगा लावाव्या लागत आहे.
यवतमाळ जिल्ह्यात एक सिलिंडरधारक ग्राहकांची संख्या १ लाख ६९ हजार १०४ आहे. तर दोन सिलिंडरधारकांची संख्या ७८ हजार १०७ आहे. या ग्राहकांना २१ एजन्सीमधून सिलिंडरचे वितरण केले जाते. बुकींग केल्यानंतर दोन ते तीन दिवसात मिळणारा सिलिंडर गेल्या काही दिवसांपासून आठ-आठ दिवस प्रतीक्षा करूनही मिळत नाही. सध्या गौरी गणपतीचे दिवस आहेत. त्यामुळे अनेकांना अतिरिक्त सिलिंडरची आवश्यकता भासते. अशा स्थितीत यवतमाळात सहा हजार ग्राहक वेटींगवर आहेत.
सिलिंडरसाठी ग्राहकांच्या एजन्सीसमोर रांगा लागल्या असून तत्काळ सिलिंडर देण्यास संबंधित एजन्सीने नकार दिला आहे. त्यामुळे हमरीतुमरीचे प्रसंगही पाहावयास मिळतात.
यवतमाळ जिल्ह्याला चंद्रपूर येथील युनीटवरून सिलिंडरचा पुरवठा होतो. या युनीटला गुजरातवरून एलपीजी गॅसचा पुरवठा होतो. मात्र काही दिवसांपासून गुजरातमधून एलपीजी गॅस पुरवठा झाला नाही. त्यामुळे गॅस युनिटचे काम खोळंबले. ग्राहकांना मागणीनुसार लागणारे सिलिंडर उपलब्ध झाले नाही. त्यामुळे वेटींगची संख्या वाढत गेली. यवतमाळात मागणीच्या तुलनेत केवळ ६० टक्के सिलिंडर उपलब्ध होत आहे. मागणी अधिक आणि पुरवठा कमी, अशी स्थिती निर्माण झाली आहे. यामुळे ग्राहक चांगलेच वैतागले आहे. सणासुदीच्या दिवसात गॅस न मिळाल्यास स्वयंपाक कसा करावा, असा प्रश्न गृहिणींना पडला आहे. (शहर वार्ताहर)