अवकाळी नुकसानाच्या मदतीची प्रतीक्षाच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 9, 2016 02:37 AM2016-03-09T02:37:33+5:302016-03-09T02:37:33+5:30
अर्थसंकल्पीय अधिवेशन; दुष्काळ व पाणीटंचाइसाठी हवा वाढीव निधी.
बुलडाणा: अवकाळी पाऊस, गारपीट व दुष्काळ अशा तिहेरी संकटात सापडलेल्या शेतकर्यांना राज्य शासनाकडून मदतीची आस आहे. या पृष्ठभूमीवर बुधवारपासून सुरू होणार्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाकडून लोकांच्या अपेक्षा उंचावल्या आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील आमदारांनी पक्षभेद विसरून शासनावर दबाव निर्माण केल्यास आपद्ग्रस्त शेतकर्यांना मदतीचे वाटप होण्याचा मार्ग सुकर होईल. जिल्हय़ातील बुलडाणा, चिखली, मोताळा, मेहकर, लोणार व देऊळगावराजा या घाटावरील तालुक्यांसोबतच मोताळा, खामगाव या दोन तालुक्यांनाही अवकाळी पावसाचा मोठा फटका बसला. कांदा, गहू, हरभरा, मका, केळी, संत्रा, डाळिंब, भाजीपाला व इतर पिके या अवकाळी पावसामुळे बाधित झाली असून, सर्वाधिक नुकसान चिखली तालुक्यात झाले आहे. त्या खालोखाल मेहकर व मोताळा तालुक्याला या अवकाळी पावसाचा फटका बसला आहे. सद्यस्थितीत कांदा बी तसेच कांदा पीक हे फुलोरा अवस्थेत असून, अवकाळी पावसामुळे हे पीक पूर्णपणे झोपले आहे. त्यामुळे शेतकर्यांचे मोठय़ा प्रमाणात नुकसान झाले. गहू पीक पक्व अवस्थेत असून, शेतकरी या पिकाच्या काढणीसाठीच व्यस्त असताना अवकाळी गारपिटीमुळे हे पीकसुद्धा हातातून गेले आहे. मका, हरभरा व भाजीपाला या सोबतच संत्रा आणि डाळिंब फळबागा अवकाळी पावसामुळे प्रभावित झाल्या आहेत. यामुळे मदतीची घोषणा लवकर होऊन त्याच वेगाने वाटप झाले तर शेतकर्यांना दिलासा मिळेल. सन २0१३ च्या मदतीचा निधी येण्यासाठी २0१६ उजाडत असेल तर यासंदर्भातही शासनाचे लक्ष वेधून प्रशासकीय गतिमानतेचा प्रश्न आमदारांनी उपस्थित केला पाहिजे.