पाऊले चालती... स्वच्छतेची वाट!
By admin | Published: July 17, 2017 02:04 AM2017-07-17T02:04:58+5:302017-07-17T02:04:58+5:30
एक दशकपासून ‘तरुणाई’ची स्वच्छता वारी
लोकमत न्यूज नेटवर्क
खामगाव: विदर्भ पंढरीनाथ संत गजानन महाराजांच्या पालखीमध्ये स्वच्छतेचा वसा जोपासण्याचा अनोखा प्रयत्न खामगाव येथील तरुणाई फाउंडेशनच्यावतीने गेल्या ११ वर्षांपासून केल्या जात आहे. स्वच्छता वारीच्या या उपक्रमाची आता विविध सामाजिक संस्थांकडूनही दखल घेतल्या जात आहे.
संत गजानन महाराजांच्या पालखीचे सोमवारी सकाळी खामगाव शहरात आगमन होत असून, मंगळवारी ही पालखी शेगाव येथे जाणार आहे. या पालखीदरम्यान, वारकऱ्यांना अन्नदान, आणि फराळाचे साहित्य देणाऱ्यांची संख्या मोठी आहे. दरम्यान, यासाठी प्लास्टिक आणि इतर साहित्याचा वापर होत असल्याने, पालखी मार्गावर मोठ्या प्रमाणात कचरा साचायचा. हा कचरा साफ करण्यासाठी खामगाव येथील तरुणाई फाउंडेशनच्यावतीने सर्वप्रथम सन २००६ साली सुरुवात करण्यात आली. पालखी मार्गावरील केळीच्या साली, प्लास्टिक द्रोण, पत्रवाळ्यांचा कचरा तरुणाईने साफ करण्यासाठी स्वच्छता वारी सुरू केली. या स्वच्छता वारीला येत्या मंगळवारी दहा वर्ष पूर्ण होणार असून, संत गजानन विजय गं्रथातील पहिल्या अध्यायातील ‘ शीत पडल्या दृष्टीप्रत । ते मुखी उचलुनी घालित। हें करण्याचा हाच हेतू ।‘अन्न परब्रम्ह’ कळवायाया’ या ओवीतून संत गजानन महाराजांनी प्रत्यक्ष कृतीतून अन्नाचे महत्त्व जाणा, असा संदेश दिला आहे.
हा संदेश प्रत्यक्ष कृतीत उतरविण्यासाठी तसेच दिंडी मार्गावरील प्रदूषण रोखण्यासाठी तरुणाईचे पदाधिकारी प्रयत्नशील आहेत.
सामाजिक संस्थांकडूनही दखल!
तरुणाई फाउंडेशनच्यावतीने गेल्या दहा वर्षांपासून स्वच्छता दिंडीच्या माध्यमातून १६ किमी मार्गावरील प्लास्टिक आणि इतर कचऱ्याचे निर्मूलन करण्यात येते. या उपक्रमामुळे स्वच्छ अभियानाला हातभार लागणार असून, या उपक्रमात मलकापूरचे संत गाडगेबाबा विचार मंच, गुरुदेव सेवा मंडळ माटरगाव, बोथा फॉरेस्ट तरुणाई, आर्ट आॅफ लिव्हिंग, हिंदुस्तान युनिलिव्हर कामगार संघ, एएनएस इन्फोव्हॅली आयटीआय, सामाजिक वनीकरण विभाग यासह अनेक संस्था आणि व्यक्तींनी या उपक्रमापासून प्रेरणा घेतली आहे.
दिंडी मार्गावरील कचरा निर्मूलनासह, अन्नाची नासाडी थांबविण्यासाठी तरुणाई फाउंडेशनच्यावतीने स्वच्छता वारी हा उपक्रम राबविण्यात येतो. या उपक्रमात इतर संस्थांचेही सहकार्य लाभते.
- नारायण पिठोरे
अध्यक्ष, तरुणाई फाउंडेशन, खामगाव.