पावले चालती शेगावीची वाट.....
By विवेक चांदुरकर | Published: February 25, 2024 05:28 PM2024-02-25T17:28:15+5:302024-02-25T17:28:25+5:30
पालख्यांचे ठिकठिकाणी स्वागत करण्यात येत असून भाविक दर्शन घेत आहेत.
खामगाव : श्री संत गजानन महाराजांच्या १४६ व्या प्रगटदिन उत्सवास रविवारपासून प्रारंभ झाला आहे. या उत्सवात सहभागी होण्याकरिता संतनगरी शेगाव येथे राज्यभरातून विविध गावातील पालख्या जात आहेत. या पालख्यांचे ठिकठिकाणी स्वागत करण्यात येत असून भाविक दर्शन घेत आहेत.
पिंपळगाव नाथ ते शेगाव पायी दिंडी शेगावला पोहोचली. या दिंडीचे पालक ह.भ.प. मोहन नामदेव कारडे आहेत तर दिंडीचालक ह.भ.प. गजानन नामदेव घोरपडे आहेत. तसेच मोताळा तालुक्यातील थड येथील पालखी २२ फेब्रुवारी रोजी शेगावला जाण्याकरिता मार्गस्थ झाली तर २५ फेब्रुवारी रोजी शेगावला पोहोचली. या पालखीचे हे पहिले वर्ष आहे. २४ फेब्रुवारी रोजी पालखीचे लासुरा फाटा येथे मुक्काम होता. २५ फेब्रुवारी रोजी सकाळी पालखी शेगावला पोहोचली. तसेच जळगाव जिह्यातील जामनेर तालुक्यातील ढालगाव ते शेगाव श्री संत गजानन महाराज पायी पालखी सोहळ्यातील पायी दिंडीने २० फेब्रुवारी रोजी शेगावसाठी प्रस्थान केले २५ फेब्रुवारी रोजी शेगावला सोहळ्याची सांगता झाली.
श्री संत गजानन महाराज मंदिर संस्था ढालगावच्यावतीने या पालखी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. अध्यक्ष राजेंद्र पुंडलिक पवार आहेत तर दिंडीप्रमुख नितीन शांताराम पवार, संपर्कप्रमुख सत्यवान काैतिक पाटील आहेत. यासोबतच ठिकठिकाणाहून भजनी दिंड्यांचे आगमन होत आहे. शेगाव येथे प्रगटदिन उत्सवानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांना सुरुवात झाली आहे. त्यामुळे संतनगरी दुमदुमली आहे. भाविकांची गर्दी होत आहे.