अल्प पावसानेच समाज मंदिराची खचली भिंत
By admin | Published: July 23, 2014 12:33 AM2014-07-23T00:33:07+5:302014-07-23T00:33:07+5:30
समाज मंदिराचे काम निकृष्ट दर्जाचे होत असून, अल्प प्रमाणात झालेल्या पावसाने समाज मंदिराची भिंत दोनदा खचली आहे.
लोणार : तालुक्यातील अजिसपूर येथील समाज मंदिराचे काम निकृष्ट दर्जाचे होत असून, अल्प प्रमाणात झालेल्या पावसाने समाज मंदिराची भिंत दोनदा खचली आहे. त्यामुळे सदर कामाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे. सन २0११-१२ मध्ये तालुक्यातील अजिसपूर येथे २0 बाय ३0 चौ.फुटाच्या समाज मंदिराच्या बांधकामासाठी जवळपास ४ लक्ष ५0 हजार रुपये मंजूर झाले होते. त्यानंतर पुन्हा सन २0१३-१४ मध्ये २0 बाय ३0 चौ.फुटाच्या समाज मंदिरासाठी २ लक्ष ७५ हजार रुपये निधी मंजूर झाला. दोन समाज मंदिरावर जवळपास ७ लक्ष २५ हजार रुपयाचा निधी मंजूर झाला. पहिल्या समाज मंदिराचे काम मंजूर होवून ३ वर्षाचा काळ उलटला तरीसुद्धा सदर कंत्राटदाराने प्रत्यक्ष कामास सुरुवात केली नाही. परंतु सन २0१३-१४ मध्ये मंजूर झालेल्या आणखी एका समाज मंदिराचे काम मिळाल्यानंतर दोन्ही मिळून एकच समाजमंदिर बांधण्याचा घाट कंत्राटदाराकडून सुरु असल्याचा आरोप आहे. जेमतेम उभ्या केलेल्या भिंतीला अल्पशा पावसाने तडे जाऊन दोनदा भिंत खचली आहे. त्यामुळे निकृष्ट दर्जाच्या होत असलेल्या समाज मंदिराचे बांधकाम गावकर्यांनी बंद पाडले आहे.