ज्ञानगंगा अभयारण्य कार्यालयाच्या भिंती झाल्या बोलक्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 6, 2021 04:36 AM2021-05-06T04:36:22+5:302021-05-06T04:36:22+5:30
बुलडाणा : येथील ज्ञानगंगा अभयारण्य कार्यालयाच्या भिंती बोलक्या झाल्या असून, बुलडाणा जिल्ह्यातील वनवैभव असलेल्या ज्ञानगंगा अभयारण्याची प्रसिद्धी व नागरिकांमध्ये ...
बुलडाणा : येथील ज्ञानगंगा अभयारण्य कार्यालयाच्या भिंती बोलक्या झाल्या असून, बुलडाणा जिल्ह्यातील वनवैभव असलेल्या ज्ञानगंगा अभयारण्याची प्रसिद्धी व नागरिकांमध्ये वन्य प्राण्यांप्रती प्रेमभावना निर्माण व्हावी, पर्यटकांनी प्रत्यक्षात जंगल सफारी करून निसर्गाची अनुभूती घ्यावी, म्हणून बुलडाणा वन्यजीव विभागाचे आरएफओ मयूर सुवसे यांनी कार्यालय व तपासणी नाक्यांच्या भिंतींवर वन्य प्राण्यांचे आकर्षित करणारे चित्र रेखाटले आहे. अजिंठा पर्वत रांगेत बुलडाणा शहरापासून १५ किलोमीटर अंतरावरच्या बोथा जंगलाला १९९७ मध्ये ज्ञानगंगा अभयारण्य म्हणून घोषित करण्यात आले असून, त्याचे ज्ञानगंगा अभयारण्य असे नामकरण करण्यात आले. याच जंगलातून ज्ञानगंगा नदीचा उगम होत आहे. जवळपास २०५ चौरस किलोमीटर क्षेत्रावर पसरलेल्या या अभयारण्यात बिबटे, अस्वल, तडस, रानकुत्रे, कोल्हे, भेडकी, चौशिंगा, निलगाय, आदी प्राणी प्रामुख्याने आढळतात. अभयारण्याच्या प्रचार, प्रसिद्धीसाठी व स्थानिक लोकांमध्ये वन्य प्राण्यांच्या प्रती आपुलकी निर्माण व्हावी, म्हणून जनजागृती करण्यासाठी बुलडाणा शहरात असलेल्या वर्दळीच्या ठिकाणी म्हणजे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर व त्रिशरण चौक येथे अनुक्रमे अस्वल व बिबटे यांचे पुतळे बसविण्यात आले आहेत. बुलडाणा येथील वनपरिक्षेत्र कार्यालय, वरवंड नाका, गोंधनखेड नाका, बोथा नाका, आदी ठिकाणच्या भिंती रंगवून भिंतींवर वन्य प्राण्याचे अतिसुंदर चित्र बनविण्यात आले आहे. बुलडाणा-खामगाव या मार्गाने ज्ञानगंगा अभयारण्यातून जाणाऱ्या लोकांना रंगविलेल्या भिंती आकर्षित करीत असून, त्यांच्या मनात जंगल सफारीची इच्छा जागृत होत आहे. पर्यटकवाढीमुळे स्थानिक लोकांचा रोजगारही वाढेल तसेच अभयारण्याचा प्रचार व प्रसार होऊन लोकांमध्ये जनजागृती होईल, हाच या मागचा उद्देश असल्याची माहिती बुलडाणा आरएफओ मयूर सुरवसे यांनी दिली आहे.