आपले सरकार केंद्र असूनही दाखल्यांसाठी पायपीट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 9, 2021 11:03 AM2021-08-09T11:03:10+5:302021-08-09T11:03:16+5:30
Shegoan News : वर्षाकाठी लाखो रूपये खर्च होऊन ही विविध दाखल्यासाठी ग्रामीण जनतेची पायपीट सुरूच आहे.
- अनिल उंबरकार
लोकमत न्यूज नेटवर्क
शेगाव : आपले सरकार सेवा केंद्रासाठी ग्रामपंचायतीकडून वर्षाकाठी लाखो रूपये खर्च होऊन ही विविध दाखल्यासाठी ग्रामीण जनतेची पायपीट सुरूच आहे. शेगाव तालुक्यातील २९ केंद्रासाठी साडेतीन वर्षात एक कोटी ४१ लाख ६५ हजार रूपये ग्रामपंचायतींना १४ व्या वित्त आयोगाच्या निधीतून खर्च द्यावा लागला.
शेगाव तालुक्यात ४६ ग्रामपंचायत अंतर्गत कंत्राटदार कंपनीचे अधिनस्त २९ आपले सरकार सेवा केंद्र सुरू करण्यात आली. संबंधित कंत्राटी कंपनीत त्या केंद्रात २९ संगणक चालक आहेत. महिन्याला १४ व्या वित्त आयोगाच्या निधीतून १,२३,३३१ रुपये ग्रामपंचायतीकडून कंपनीला अदा करावे लागतात. एका आपले सरकार सेवा केंद्राचा एक वर्षाचा खर्च १ लाख ४७ हजार ९७२ रुपये असल्याची माहिती प्राप्त झाली आहे.
मोठ्या ग्रामपंचायतींना भुर्दंड
शेगाव तालुक्यातील ४६ ग्रामपंचायतींपैकी तालुक्यात मोठ्या असलेल्या १७ ग्रामपंचायतींनी ८३ लाखांचा भुर्दंड सोसावा लागला आहे. त्यात अळसना, भोनगाव, चिंचोली, गायगाव बु, गौलखेड,जलंब ,जानोरी, जवळा बु,जवळा प, खेरडा, लासुरा, माटरगाव,पहुरजीरा,शिराजगाव,टाकळी विरो, तीत्रव,तरोडा कसबा या ग्रामपंचायतींना प्रत्येकी ४,९३,२४० रुपयांचा आपले सरकार केंद्राचा भार उचलावा लागला.
सुविधांची तपासणी आवश्यक
ग्रामपंचायत स्तरावरील आपले सरकार सेवा केंद्राचा नियमित सुरू ठेवण्यासाठी आवश्यक नेट सेवा,संगणक संच व इतर सुविधा अपडेट व प्रभावीपणे असावी,यासाठी शासनस्तरावरून प्रयत्न होणे गरजेचे आहे. प्रत्येक ग्रामपंचायतीच्या ठिकाणी आपले सरकार सेवा केंद्रांतर्गत जनतेला सुविधा मिळते की नाही याबाबत तपासणी होणे सुद्धा आवश्यक आहे.