नांद्रा येथे पाण्यासाठी महिलांची भटकंती
By admin | Published: May 15, 2017 12:36 AM2017-05-15T00:36:56+5:302017-05-15T00:36:56+5:30
नांद्रा : पाणीटंचाईवर मात करण्यासाठी काही ठोस उपाययोजना करण्याऐवजी सर्वच स्तरावरून निष्फळ धावपळ होत आहे. त्यामुळे नांद्रा येथे तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नांद्रा : पाणीटंचाईवर मात करण्यासाठी काही ठोस उपाययोजना करण्याऐवजी सर्वच स्तरावरून निष्फळ धावपळ होत आहे. त्यामुळे नांद्रा येथे तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली आहे. महिलांची पाण्यासाठी भटकंती होत आहे. गुराढोरांसह नागरिकांना पाणीटंचाईच्या झळा सोसाव्या लागत आहेत.
आतापर्यंत पाणीपुरवठ्याच्या विहिरीला पुरेसे पाणी होते. तेव्हा लाइनचा पुरवठा होत नसल्याने व सतत बिघाडाने पाणीटंचाई होती. यावर उपाय म्हणून ग्रामपंचायतीने दोन महिन्यांपूर्वी तहसीलदारांना निवेदन देऊन नांद्रा गावाकडून लाइन जोडून देण्याची विनंती केली होती, ज्यामुळे जास्त विद्युत पुरवठा होऊन सतत होणाऱ्या विद्युत बिघाडावर लक्ष देणे सोपे होत होते. यावर तहसीलदार यांनी महावितरणला पत्र दिले व ही जोडणी न केल्यास यामुळे निर्माण होणाऱ्या पाणीटंचाईला व समस्येला आपण जबाबदार राहाल, असे बजावले होते. तहसीलदाराच्या या पत्राला महावितरणने केराची टोपली दाखवत कोणतीच उपाययोजना केली नाही. त्यामुळे पाणी असूनही विद्युत पुरवठ्याअभावी नांद्रावासीयांना पाणीटंचाईचा सामना करावा लागला. त्यानंतर काही दिवसांनी ग्रामपंचायतने २००० फूट शेतकऱ्याचा केबल वायर टाकून विद्युतची व्यवस्था केली; परंतु तोपर्यंत विहिरीचे पाणी कमी झाले. या अगोदर नांद्रा येथील पाणीटंचाईबाबत संबंधितांचे लक्ष वेधले असता, लोणार तहसीलदार तथा गटविकास अधिकारी यांनी गावाला भेट देऊन विहिरीची खोली वाढविण्याचा सल्ला दिला. अगोदर विद्युतअभावी तर आता पाण्याअभावी गावात पाणीटंचाई कायम आहे.