शाश्वत व हक्काचे आरक्षण हवे, मराठा मोर्चामधील सूर; बुलढाण्यात ‘एक मराठा, लाख मराठा'
By निलेश जोशी | Published: September 13, 2023 04:48 PM2023-09-13T16:48:46+5:302023-09-13T16:49:07+5:30
१३ सप्टेंबर रोजी दुपारी बारा वाजेच्या सुमारास मोर्चास प्रारंभ झाला. ‘एक मराठा, लाख मराठा’ अशा घोषणांनी यावेळी संपूर्ण बुलढाणा शहर दणाणून गेेल होते.
बुलढाणा : मराठा आरक्षणासोबतच जालन्यातील अंतरवाली सराटी येथील आंदोलकांवरील लाठीमाराच्या निषेधार्थ बुलढाणात १३ सप्टेंबर रोजी सकल मराठा क्रांती मोर्चा काढण्यात आला. जिजामाता प्रेक्षागारातून शांततेत व शिस्तीत हा मोर्च काढण्यात आला.
संगम चौक, जयस्तंभ चौक, आठवडी बाजार रस्ता मार्गे जिल्हाधिकारी कार्यालयावर हा मोर्चा धडकला. तेथे जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांना जिजाऊंच्या लेकींच्या हस्ते मागण्यांचे निवेदन देण्यात आले. त्यानंतर हा मोर्चा स्थानिक जयस्तंभ चौकात पोहोचला. तेथे या मोर्चाचे सभेत रुपांतर झाले.
१३ सप्टेंबर रोजी दुपारी बारा वाजेच्या सुमारास मोर्चास प्रारंभ झाला. ‘एक मराठा, लाख मराठा’ अशा घोषणांनी यावेळी संपूर्ण बुलढाणा शहर दणाणून गेेल होते. दरम्यान जयस्तंभ चौकात हा मोर्चा पोहोचल्यानंतर मोर्चाचे सभेत रुपांत झाले. यावेळी मराठा मोर्चाचे नेतृत्व करणाऱ्या समीक्षा, दीपाली भोसले, गायत्री खराटे, वैष्णवी कड यांनी मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर त्यांची भूमिका मांडली. शाश्वत व हक्काचे आरक्षणासाठी मराठा समाजाचा संघर्ष सुरू असून दुसऱ्याचे नुकसान करून आम्हाला आरक्षण नको. आम्हाला आमच्या हक्काचे आरक्षण द्यावे. दुसऱ्याच्या वाट्यातून ते नको असे या जिजाऊंच्या लेकींनी सांगितले.
पल्लवी जरांगेचेही आवेशपूर्ण भाषण
अंतरवाली सराटी येथे उपोषणास बसलेले मनोज जरांगे यांची कन्या पल्लवी, आणि त्यांच्या भारती कटारे आणि सुवर्णा शिंदे या दोन्ही बहीणींनी मोर्चात सहभगा घेतला. त्यामुळे मोर्चेकऱ्यांमध्ये उत्साह अेासंडून वाहत होता. मनोज जरांगे यांचे आंदोलन हे समाजाच्या मागण्यांसाठी आहे. आपण सर्व स्वत:च्या हक्कासाठी आज रस्त्यावर उतरलो आहोत. अंतरवाली सराटी येथे शांततेत आंदोलन सुरू असतांना त्यांच पोलिसांनी अमानुष लाठीमार केला. पण आपण वाघ आहोत. मराठा सहसहा पेटून उठत नाही, पण पेटून उठला तर विझत नाही, असे वक्तव्य करत पल्लवीने आरक्षणाशिवाय माघार नसल्याचे स्पष्ट केले.
आरक्षणासाठी आत्महत्या नकरण्याचे आवाहन
मराठा आरक्षणाचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. मनोज जरांगे हे त्यासाठी उपोषण करत आहेत. परंतू या उपोषणाला पाठींबा म्हणून काही जण स्वत:चा जीव धोक्यात घालत आहे. आरक्षण मिळाल्यानंतर तरुण मुले जेव्हा नोकरीमध्ये जातील ते मनोज जरांगेंना बघायचे आहे. त्यामुळे कृपया करून कोणीही आरक्षणाच्या मुद्द्यावर स्वत:चा जीव धोक्यात घालू नये, असे आवाहन मनोज जरांगे यांची बहीण भारतीताई कटारे यांनी केल आहे. शांततेच्या व संवैधानिक मार्गाने शाश्वत आरक्षणासाठीचा हा आपला लढा असल्याचे त्या म्हणाल्या. आपले भाऊ मनोज जरांगे यांनी हाच संदेश घेऊन आपल्याला येथे पाठवल्याचे त्या म्हणाल्या.