गावपुनर्वसनाच्या मागणीसाठी जलसमाधी आंदोलनाचा इशारा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 6, 2021 04:38 AM2021-09-06T04:38:46+5:302021-09-06T04:38:46+5:30
गारखेडा गावाचे पुनर्वसन करण्याची मागणी राष्ट्रीय समाज पक्ष आणि गावकऱ्यांचे बुधवारी जलसमाधी आंदोलन सिंदखेडराजा : तालुक्यातील गारखेडा हे मूळ ...
गारखेडा गावाचे पुनर्वसन करण्याची मागणी
राष्ट्रीय समाज पक्ष आणि गावकऱ्यांचे बुधवारी जलसमाधी आंदोलन
सिंदखेडराजा : तालुक्यातील गारखेडा हे मूळ गाव धरणाच्या खाली वसलेले आहे. १९७२ मध्ये बांधलेले हे धरण फुटल्यास शंभर घरे असलेले हे गाव पाण्याखाली येण्याची भीती असल्याने येथील गावकऱ्यांनी गावाचे इतरत्र पुनर्वसन करण्याची मागणी लावून धरली आहे. दरम्यान, हा प्रश्न त्वरेने निकाली न काढल्यास ८ सप्टेंबर रोजी गावातीलच धरणात जलसमाधी आंदोलन करण्याचा इशारा राष्ट्रीय समाज पक्ष युवा आघाडीचे जिल्हाध्यक्ष राम लवहकरे यानी ५ सप्टेंबर रोजी दिला आहे.
गारखेडा गावातच ही पत्रकार परिषद झाली. सिंदखेडराजापासून २० किमी अंतरावर हे गाव आहे. स्वतंत्र ग्रामपंचायत असलेल्या या गावात ग्रामपंचायत कार्यालय नाही हीच एक मोठी समस्या आहे. दरी, डोंगर अशी नैसर्गिक साधनं असलेल्या या गावात १९७२ मध्ये दोन डोंगरांच्या मध्ये माती धरण बांधले गेले. मात्र, नागरी सुविधांचा गावाला स्पर्श नसल्याने आजही येथे अनेक नागरी समस्या आहेत. दरम्यान, गाव खाली आणि धरण वरच्या बाजूला असल्याने आणि धरणाच्या बांधकामाला ५० वर्षे होत असल्याने गावकऱ्यांमध्ये गेल्या अनेक वर्षांपासून गावाच्या पुनर्वसनाचा मुद्दा चर्चिला जात आहे. १५ वर्षांपासून गावाच्या पुनर्वसनाची मागणी आहे. याच काळात गावातील दोन वॉर्ड स्वतंत्र जागेत विभागले गेले. एक तांडा आणि एक वस्ती असे हे गाव असून, मूळ गारखेडा गाव आजही धरणाच्या किंबहुना नदीच्या काठावर आहे. याच मूळ गावाचे नदीच्या पलीकडे म्हणजे पूर्वेला असलेल्या शिरणेर शिवारात पुनर्वसन करण्याची मागणी आहे. पत्रकार परिषदेला रासपाचे जिल्हाध्यक्ष अमोल काकडे, शेख मतलब शेख अहमद, राधाकृष्ण इंगळे, सोपान इंगळे, मधुकर लवहकरे, रघुनाथ भिसे, जगणं भिसे, सुदाम राठोड, रामप्रसाद, ज्ञानेश्वर आटोळे उपस्थित होते. जलसमाधी आंदोलनासंदर्भात तहसीलदार सुनील सावंत यांनाही एक निवेदन देण्यात आलेले आहे.
मुख्यमंत्र्यांना भेटणार : जानकर
गारखेडा गावाच्या पुनर्वसनासाठी प्रशासनाने सहकार्य करावे, कार्यकर्ते आपल्या हक्कांसाठी लढतात. त्यामुळे त्यांच्या प्रश्नांकडे डोळसपणे पाहण्याची गरज आहे. गावाचे पुनर्वसन न झाल्यास कार्यकर्ते तीव्र आंदोलन करतील. त्यासाठी आम्ही त्यांच्या पाठीशी आहोत. या संदर्भात आपण स्वत: मुख्यमंत्र्यांची भेट घेणार असल्याचे माजी मंत्री महादेव जानकर यांनी सांगितले.