मजुरी न मिळाल्याने आत्मदहनाचा इशारा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 4, 2021 04:41 AM2021-09-04T04:41:45+5:302021-09-04T04:41:45+5:30
हनवतखेड येथील मजुरांनी काटेपांग्री, तढेगाव, नागझरी, दरेगाव, साखरखेर्डा, शेंदुर्जन या रोडलगत निंदन करणे, वृक्षांना पाणी टाकणे, मरगळ आलेली झाडे ...
हनवतखेड येथील मजुरांनी काटेपांग्री, तढेगाव, नागझरी, दरेगाव, साखरखेर्डा, शेंदुर्जन या रोडलगत निंदन करणे, वृक्षांना पाणी टाकणे, मरगळ आलेली झाडे पुन्हा लावणे, दगडी पोळ तयार करणे आदी कामे २०२०-२१ मध्ये केली होती. तालुका वनपरिक्षेत्र अधिकारी अभिमन्यू खलसे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि धनपाल लद्धड व दीपक फुके यांच्या उपस्थितीत ही कामे झाली आहेत. ही कामे केल्यानंतर सामाजिक वनीकरण विभागाच्या अधिकाऱ्यांनी दर महिन्याला मजुरांची मजुरी द्यायला पाहिजे होती; परंतु एक वर्ष लोटूनही भगवान महाजन हनवतखेड, राजू तितनवरे हनवतखेड, राजू सावरकर शेंदुर्जन यासह इतर मजुरांचे १८ लाख ५० हजार रुपये सार्वजनिक वनविभागाकडे बाकी आहेत. ही बाब वरिष्ठ अधिकाऱ्यांना या अगोदर देण्यात आली होती. त्यांनी मजुरांचे थकीत पैसे देण्याचे आदेश खलसे यांना दिले होते. त्यांनी अद्याप मजुरीचे पैसे दिले नाहीत. खलसे यांची मराठवाड्यात बदली झाल्यामुळे आपली मजुरी हडप करण्याचा डाव असल्याचा आरोप वनमजुरांमधून होत आहे. त्यामुळे ९ सप्टेंबरपर्यंत मजुरीचे पैसे मिळाले नाहीत, तर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आत्मदहन करण्यात येईल, असा इशारा भगवान महाजन, राजू तितनवरे, राजू सावरकर यांनी दिला आहे.
या अगोदर वनमजूर मधुकर खंडारे यांनीसुद्धा महिला मजुरांचे पैसे मिळावे, यासाठी उपोषणाचा इशारा दिला होता. त्यांना २० हजार रुपये देऊन उर्वरित पैसे नंतर देण्याच्या लेखी आश्वासनावर उपोषण मागे घेतले. या कामावर ३५ मजूर होते. त्यांच्या मजुरीचे पैसे अद्याप मिळाले नाही.
भगवान माधव महाजन, वनमजूर, हनवतखेड.
यशोदा मजूर सहकारी संस्थेमार्फत वनमजुरांनी कामे केली होती. संस्थेचे अध्यक्ष सुरेश जाधव यांनी या मजुरांना पैसे दिले आहेत.
अभिमन्यू खलसे, सार्वजनिक वनअधिकारी, सिंदखेडराजा.