रुग्णांच्या वेदनेवर फुंकर घालणारी योद्धा!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 8, 2021 04:32 AM2021-03-08T04:32:15+5:302021-03-08T04:32:15+5:30
बुलडाणा : कोरोना रुग्णांच्या संपर्कात आलेल्या अनेक नर्स आणि डॉक्टरही कोरोना पॉझिटिव्ह झाल्याचे प्रकार समोर आले आहेत, परंतु जिवाची ...
बुलडाणा : कोरोना रुग्णांच्या संपर्कात आलेल्या अनेक नर्स आणि डॉक्टरही कोरोना पॉझिटिव्ह झाल्याचे प्रकार समोर आले आहेत, परंतु जिवाची पर्वा न करता, कर्तव्याला महत्त्व देत बुलडाण्यातील अधिपरिचारिका शीतल मोगल यांनी कोरोनाबाधित रुग्णांची सेवा केली. रुग्णांच्या वेदनेवर फुंकर घालणाऱ्या या महिला कोरोना योद्धाची रुग्णसेवा आणि ममत्वाची कसरत वाखणण्याजोगी आहे.
८ मार्च रोजी असलेल्या जागतिक महिला दिनाच्या पार्श्वभूमीवर महिला कोरोना योद्धांची माहिती जाणून घेतली असता, बुलडाण्यातील अधिपरिचारिका शितल मोगल यांची रुग्णसेवा अधोरेखित होते. कोरोनाच्या सुरुवातीच्या काळातच शीतल मोगल यांची ड्युटी कोविड सेंटर आयुर्वेदिक विद्यालय बुलडाणा येथे लागली. दिवसाची ड्युटी असेल, तर आठ तास आणि रात्री असेल, तर बारा तास त्यांनी कोविड सेंटरला कोरोना रुग्णांची सेवा केली. घरी ११ वर्षांची छोटी मुलगी एकटी असतानाही, त्यांनी आपल्या रुग्णसेवेला प्राधान्य दिले. घर आणि रुग्णालय याचा मेळ साधताना त्यांची मोठी कसरत झाल्याचे दिसून येते. आपल्यापासून कुटुंबाला काही त्रास होऊ नये, यासाठी त्यांनी तेवढी काळजीही घेतली. रुग्णालयात गेल्यापासून पीपीई किटमध्ये आणि जेवण, पाणी सर्व बंद. कोरोना रुग्णांना जेवण देणे, औषध देणे, प्रत्येक तासाला त्यांची तपासणी करणे आदी कामे करत असताना, त्यांनी या कठीण प्रसंगाला न घाबरता या संधीचे रूपांतर रुग्णसेवेत केले.
रुग्णांचा आशीर्वाद मोठे बक्षीस
शीतल मोगल यांचे मूळगाव सिंदेखड राजा तालुक्यातील चांगेफळ. त्यांनी आपले शिक्षण जळगाव खा.मध्ये पूर्ण केले. त्यानंतर, २००४ मध्ये त्या अधिपरिचारिका म्हणून रुजू झाल्या. १६ वर्षांत अनेक वेळा त्यांचा उत्कृष्ट कामासाठी गौरवही झाला. १५ ऑगस्ट, २०२०ला त्यांना जिल्हा प्रशासनाचे कोरोना योद्धा प्रमाणपत्र मिळाले, परंतु त्याहीपेक्षा मोठे बक्षीस त्यांना मिळाले, ते म्हणजे रुग्णसेवेचा आशीर्वाद. सध्या त्या जिल्हा सामान्य रुग्णालयातील शस्त्रक्रिया विभागात कार्यरत आहेत.
न विसरता येणारा अनुभव
कोविड सेंटरमध्ये रात्री साडेआठ वाजता ड्युटी संपली. घरी मुलगी एकटीच वाट बघत होती. बाहेर विजांच्या कडकडाटासह पाऊस सुरू होता. मुलीचे फोनवर फोन येत होते. रात्रीची वेळ घर रुग्णालयापासून दूर, तरीही मुलीसाठी रात्री भरपावसात घर गाठले, या न विसरता येणाऱ्या त्यांच्या अनुभवावरून रुग्णसेवा आणि घर सांभाळताना त्यांची कसरत स्पष्ट होते.