जिल्हाधिकारी कार्यालयात धुतले धुणे
By admin | Published: September 20, 2016 12:25 AM2016-09-20T00:25:15+5:302016-09-20T00:25:15+5:30
बुलडाणा येथे परिट समाजाचे अभिनव आंदोलन.
बुलडाणा, दि. १९ : आपल्या विविध मागण्यांसाठी परिट समाजाच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर १९ सप्टेंबर रोजी दुपारी धुणे धुवून आंदोलन करण्यात आले.
महाराष्ट्र राज्यातील परिट (धोबी) जातीला पूर्ववत अनुसूचित जातीच्या (एस.सी.) यादीत समाविष्ट करण्यासाठी महाराष्ट्र राज्याच्या सामाजिक न्याय विभागाने डॉ.दशरथ भांडे अभ्यास समितीच्या अहवालावरून मराठी, हिंदी व इंग्रजी भाषेतून तसेच यासाठीच्या आवश्यक असलेली राज्य शासनाची स्वयंस्पष्ट शिफारस केंद्रीय सामाजिक न्याय विभागाकडे पाठविण्यासाठी तातडीने कार्यवाही होण्याची मागणी करण्यात आली. सन १९९६ मध्ये डॉ.बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी) पुणे यांच्या अभ्यास अहवालाऐवजी त्यानंतर नव्याने स्थापन होऊन सादर केलेल्या डॉ.भांडे अभ्यास समितीचा अहवाल प्रमाण मानण्यात यावा, अशा सामाजिक न्याय विभागाला सूचना व्हाव्यात, आदी मागण्या करण्यात आल्या. यावेळी गणेश खर्चे, श्याम डंबेलकर, संजय सुरडकर, अरुणा रायपुरे, एम.डी.चव्हाण, मधुकर लिहणकर, विजय दहीभाते, अजय सोनोने, सोपान केणे, रतन कोंडाणे, गोपाल भाग्यवंत, उत्तम तरडकर, गजानन काकडे आदींची उपस्थिती होती.