पश्चिम वऱ्हाडात दहावीच्या निकालात पुन्हा वाशिमची बाजी; बुलढाणा जिल्हा दुसऱ्या स्थानी; विभागाचा निकाल ९३.२२ टक्के
By ब्रह्मानंद जाधव | Published: June 2, 2023 02:31 PM2023-06-02T14:31:28+5:302023-06-02T14:32:01+5:30
अमरावती विभागाचा ९३.२२ टक्के निकाल
बुलढाणा - महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचा इयत्ता दहावीचा निकाल २ जून रोजी जाहीर झाला. अमरावती विभागाचा ९३.२२ टक्के निकाल लागला असून, यामध्ये पश्चिम वऱ्हाडात वाशिम जिल्ह्यानेच बाजी मारली आहे. तर बुलढाणा जिल्हा दुसऱ्या स्थानी राहिला आहे.
राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्यावतीने मार्च २०२३ मध्ये घेण्यात आलेल्या इयत्ता दहावीच्या निकालाची विद्यार्थ्यांना प्रतीक्षा लागली होती. बारावीच्या निकालानंतर आता दहावीचा निकाल केव्हा लागेल याची उत्सूकता मुलांना होती. पश्चिम वऱ्हाडात बारावीच्या निकालात वाशिम जिल्हा अव्वल राहिला, त्यानंतर दहावीच्या निकालातही वाशिम जिल्ह्याने आपले स्थान अमरावती विभागात प्रथम क्रमांकावर ठेवले आहे. अमरावती विभागाचा इयत्ता दहावीचा निकाल ९३.२२ टक्के निकाल लागला असून, यामध्ये प्रथम क्रमांकावर असलेल्या वाशिम जिल्ह्याचा निकाल ९५.१९ टक्के लागला आहे. पश्चिम वऱ्हाडातून दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या बुलढाणा जिल्ह्याचा निकाल ९३.९० टक्के, त्यानंतर अकोला जिल्ह्याचा निकाल ९३.६२ टक्के लागला आहे.
असा आहे वऱ्हाडातील निकाल
जिल्हा मुले मुली एकूण
अकोला ९१.२२ ९६.२७ ९३.६२
बुलढाणा ९२.४९ ९५.६१ ९३.९०
वाशिम ९४.०३ ९६.६४ ९५.१९
वऱ्हाडातून ७७ हजार ८०५ विद्यार्थी उत्तीर्ण
पश्चिम वऱ्हाडातील अकोला, बुलढाणा आणि वाशिम या तीन जिल्ह्यातून एकूण ८२ हजार ६६२८ विद्यार्थ्यांनी इयत्ता दहावीची परीक्षा दिली होती. यामध्ये ७७ हजार ८०५ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. अकोला जिल्ह्यातील २४ हजार ७१९ विद्यार्थ्यांपैकी २३ हजार १४४ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून मुलांची संख्या ११ हजार ८१३ व मुली ११ हजार ३३१ आहेत. बुलढाणा जिल्ह्यात ३८ हजार ९८३ विद्यार्थ्यांपैकी ३६ हजार ६०७ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. यात मुले १९ हजार ७५१ आणि मुली १६ हजार ८५६ आहेत. वाशिम जिल्ह्यात १८ हजार ९६६ विद्यार्थ्यांपैकी १८ हजार ५४ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. त्यामध्ये मुले ९ हजार ९१० आणि ८ हजार १४४ आहेत.
रिपीटर विद्यार्थ्यांचा ५५ टक्के निकाल
पश्चिम वऱ्हाडातील दहावीच्या रिपीटर विद्यार्थ्यांचा निकाल ५५ टक्क्यांवर लागला आहे. बुलढाणा जिल्ह्याचा ५१.९५ टक्के, अकोला जिल्हा ५७.४७ टक्के आणि वाशिम जिल्ह्याचा ६६.०७ टक्के निकाल रिपीटर विद्यार्थ्यांचा लागला आहे.