बारावी निकालात पश्चिम वऱ्हाडात वाशिम अव्वल; बुलढाणा जिल्हा दुसऱ्या स्थानी
By ब्रह्मानंद जाधव | Published: May 25, 2023 03:07 PM2023-05-25T15:07:33+5:302023-05-25T15:08:38+5:30
बुलढाणा जिल्हा दुसऱ्या स्थानी : विभागाचा ९२.७५ टक्के निकाल
बुलढाणा : महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून फेब्रुवारी २०२३ मध्ये घेण्यात आलेल्या बारावी परीक्षेचा निकाल २५ मे रोजी जाहीर करण्यात आला आहे. अमरावती विभागाचा एकूण निकाल ९२.७५ टक्के लागला असून, पश्चिम वऱ्हाडातून वाशिम जिल्हा अव्वल राहिला आहे. बुलढाणा जिल्हा दुसऱ्या स्थानी आहे.
फेब्रुवारी २०२३ मध्ये झालेल्या इयत्ता बारावी परीक्षेच्या निकालाची विद्यार्थ्यांना उत्सुकता लागली होती. दरम्यान, महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून २५ मे रोजी बारावी परीक्षेचा निकाल ऑनलाईन जाहीर करण्यात आला. यामध्ये अमरावती विभागाचा ९२.५७ टक्के निकाल लागला आहे. पश्चिम वऱ्हाडात वाशिम जिल्हा टॉपर असून, वाशिम जिल्ह्याचा निकाल ९५.४५ टक्के लागला आहे. वऱ्हाडातून दुसऱ्या स्थानी असलेल्या बुलढाणा जिल्ह्याचा निकाल ९३.६९ टक्के लागला आहे. त्यानंतर अकाेला जिल्ह्याचा निकाल ९३.११ टक्के लागला आहे. अमरावती विभागातून १ लाख ३८ हजार ५६४ विद्यार्थ्यांनी बारावीची परीक्षा दिली होती. त्यामध्ये मुलींची संख्या ६४ हजार ३६४ आणि मुलांची संख्या ७४ हजार २०० होती. यातील १ लाख २८ हजार ५२१ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. उत्तीर्ण विद्यार्थ्यांमध्ये मुली ६१ हजार ४२ व मुले ६७ हजार ४७९ आहेत. पश्चिम वऱ्हाडात वाशिम जिल्ह्यात बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे प्रमाण सर्वाधिक आहे.
पश्चिम वऱ्हाडातील चित्र (टक्के)
जिल्हा मुले मुली एकूण
बुलढाणा ९२.५० ९५.१७ ९३.६९
वाशिम ९४.५२ ९६.७५ ९५.४५
अकोला ९१.०१ ९५.५० ९३.११
पश्चिम वऱ्हाडातील ७० हजार विद्यार्थी उत्तीर्ण
पश्चिम वऱ्हाडातील अकोला, बुलढाणा व वाशिम या तीन जिल्ह्यातून ७४ हजार ७७६ विद्यार्थ्यांनी बारावीची परीक्षा दिली होती. त्यापैकी ७० हजार २४७ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. वाशिम जिल्ह्यातून १७ हजार ५८०, बुलढाणा ३० हजार २८५ आणि अकोला जिल्ह्यातील २२ हजार ३८२ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.
असा आहे शाखानिहाय निकाल
अमरावती विभागाच्या बारावी परीक्षेच्या शाखानिहाय निकालावर प्रकाश टाकला असता विज्ञान शाखेचा सर्वाधिक निकाल लागल्याचे दिसून येते. विज्ञान शाखेचा निकाल ९८.१४ टक्के, कला ८६.६४ टक्के आणि वाणिज्य शाखेचा ९३.१५ टक्के निकाल लागला आहे.