कोरोनाच्या नावाखाली उधळपट्टी; प्रतिबंधित क्षेत्रासाठी हजारोंचा खर्च
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 23, 2020 11:01 AM2020-08-23T11:01:56+5:302020-08-23T11:02:07+5:30
एरीया सील करण्यासाठी लागणाऱ्या साहित्याच्या किंमतीपेक्षाही भाडेच अधीक आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
बुलडाणा : जिल्ह्यातील ग्रामीण भागात कोरोना संसर्ग झपाट्याने वाढत आहे.कोरोनामुळे आर्थीक संकट आलेले आहे. अशा स्थितीत कोरोनाच्या नावाखाली उधळपट्टी सुरू असल्याचे चित्र आहे.एरीया सील करण्यासाठी लागणाऱ्या साहित्याच्या किंमतीपेक्षाही भाडेच अधीक असल्याचे चित्र आहे.
ग्रामीण भागात कोरोनाचा कहर सुरूच असल्याचे चित्र आहे. गाव पातळीवर ग्रामपंचायत प्रशासन रुग्ण आढळलेला परिसर सील करते. रुग्णाचे घर असलेले रस्ते दोन्ही बाजुंनी बंद करण्यात येतात. त्यासाठी बांबू, लोखंडी खांब आणि नारळाची दोरी इत्यादी साहीत्य लागते. या साहित्यासाठी ग्रामीण भागात उधळपट्टी सुरू असल्याचे चित्र आहे. एक कंटेनमेंट झोन तयार करण्यासाठी १५ बांबू लागतात. तसेच पॉझिटीव्ह रुग्णाचे घर असलेले रस्ते दोन्ही बाजुने बंद करण्यात येतात. डोणगाव येथे आतापर्यंत २४ कोरोना पॉझिटीव्ह रुग्ण आढळलेले आहेत. तसेच आतापर्यंत आठ कंटेनमेंट झोन तयार करण्यात आलेले आहेत. एका कंटेनमेंट झोनसाठी २८ दिवसांचा खर्च जवळपास ९ हजार रुपये येत असल्याचे दाखवण्यात येत आहे. ग्रामपंचायती एरीया सील करण्यासाठी साहित्य भाड्याने घेत आहेत. एका बांबुचे भाडे जवळपास तीन रुपये आकारण्यात येत आहे. डोणगाव ग्रामपंचायतींने एरीया सील करण्यासाठी आतापर्यंत जवळपास ७२ हजार रुपये खर्च केले आहेत.
अनेक ठिकाणी मंडपातील साहित्याचा वापर
यावर्षी कोरोनामुळे विवाह सोहळे व इतर कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत. त्यामुळे, मंडप, डेकोरेशन व्यवसायीकांचे साहित्य पडून आहे. अनेक गावांमध्ये याच साहित्याचा वापर कंटेनमेंट झोन तयार करण्यासाठी येत आहे. अनेक ठिकाणी केवळ बॅरीगेट्स लावण्यात येत आहेत. त्यामुळे, कंटेनमेंट झोन तयार करण्यासाठी हजारोंचा खर्च करण्यात येत आहे.