बुलडाणा जिल्ह्यातील २२५ मतदान केंद्रावर राहणार आयोगाचा वॉच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 20, 2019 06:43 PM2019-03-20T18:43:57+5:302019-03-20T18:44:02+5:30
बुलडाणा जिल्ह्यातील २२५ मतदान केंद्रावरील निवडणूक प्रक्रियेवर निवडणूक विभाग थेट वेब कास्टींगद्वारे वॉच ठेवणार आहे.
- नीलेश जोशी
बुलडाणा: लोकसभा निवडणुकीचा बिगूल वाजून जवळपास १५ दिवसांचा कालावधी लोटला असला तरी दररोज निवडणुकीची प्रक्रिया पारदर्शकपणे राबविण्यासाठी निवडणूक आयोगाकडून नवनीन पावले उचलण्यात येत असून त्यातंर्गतच बुलडाणा जिल्ह्यातील २२५ मतदान केंद्रावरील निवडणूक प्रक्रियेवर निवडणूक विभाग थेट वेब कास्टींगद्वारे वॉच ठेवणार आहे.
जिल्हाधिकारी, राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी आणि दिल्ली येथील केंद्रीय निवडणूक आयोगाचे वरिष्ठ अधिकारी यांना या मतदान केंद्रावरील हालचाली थेट पाहता येणार आहे. वेब कास्टींगच्या माध्यमातून या केंद्रांवर प्रामुख्याने आयोगाची ही नजर राहणार आहे. गेल्यावळी बुलडाणा जिल्ह्यातील नऊ मतदान केंद्रावर विधानसभा निवडणुकीदरम्यान थेट कॅमेर्याची नजर होती. यंदा लोकसभा निवडणुकीत मात्र वेब कास्टींगद्वारे आयोगाचा वॉच राहणार आहे. बुलडाणा जिल्ह्यात दोन हजार २५१ मतदान केंद्र असून (रावेर मधील मलकापूर विधानसभाग पकडून) या मतदान केंद्रांमधील दहा टक्के मतदान केंद्रावर वेब कास्टींगद्वारे नजर ठेवण्याचे निर्देश निवडणूक आयोगाने दिले आहेत. त्यानुषंगाने प्रशासकीय पातळीवर सध्या जोरदार हालचाली सुरू असून यासंदर्भातील तांत्रिक बाबींची प्रक्रियाही जवळपास पूर्ण करण्यात आली असल्याची माहिती आहे. दरम्यान, वर्तमान स्थितीत जिल्ह्यात उपद्रव क्षम तथा क्रिटीकल केंद्रांची संख्या निश्चित झाली नसली तरी मतदान केंद्रांचा जुना इतिहास अर्थात पूर्वपिठीका पाहता अनुषंगिक माहिती गोळा करण्याचे काम यंत्रणा सध्या करीत आहे. अशा केंद्रांचा प्रामुख्याने यात समावेश असावा, असे निवडणूक आयोगाचे निर्देश आहेत. दरम्यान, अशा केंद्रांवर पोलिसांचा बंदोबस्तही तगडा ठेवला जाणार असल्याचे संकेत आहेत. २०१४ च्या निवडणुकीत ज्या मतदान केंद्रांवर ९० टक्क्यांपेक्षा अधिक मतदान झाले आहे आणि एकाच उमेदवाराला त्यातील ७५ टक्क्यांपेक्षा अधिक मतदान झाले आहे अशा केंद्रांचा प्रामुख्याने यात समावेश राहणार आहे. अशा मतदान केंद्रांवर सुक्ष्म निरीक्षकांचीही सुक्ष्म नजर राहण्याची शक्यता आहे. वेब कास्टींगसह सुक्ष्म निरीक्षक अशी दुहेरी फळी यात गुंतणार असल्याने असामाजिक तत्वांचे निवडणूक प्रक्रियेदरम्यान फावणार नाही, याची काळजी घेण्याचा उद्देश या मागे आहे. गेल्या लोकसभा निवडणुकीतही वेबकास्टिंगद्वारे मतदान केंद्रावर प्रथमच लक्ष ठेवल्या गेले होते.
उपद्रवक्षम आणि क्रिटीकल केंद्र
ज्या मतदान केंद्रांवर मतदारांना धोका संभवतो, व्होटर मिसिंगचे प्रमाण अधिक असते, मतदान केंद्राच्या क्षेत्रा लगतच्या वस्तीवर दबाव तंत्राचा वापर होत असले किंवा संबंधित मतदान केंद्राच्या परिसरात यापूर्वी काही गुन्हे घडलेले आहेत असा इतिहास आहे ती केंद्रे उपद्रवक्षम (व्हर्नेबल) आणि संवेदनशील (क्रिटीकल) या व्याख्येत मोडतात. बुलडाणा जिल्ह्यात वर्तमान स्थितीत देऊळगाव राजा तालुक्यातील सुरा येथील एक केंद्र तुर्तास संवेदनशील या व्याखेत बसते, असे सुत्रांनी सांगितले.
गत वेळी या केंद्रांकडे होते लक्ष
गेल्या विधानसभा निवडणुकीदरम्यान बुलडाणा जिल्ह्यातील पोलिस स्टेशननिहाय काही संशयास्पद मतदान केंद्र होते. यामध्ये बुलडाणा-४, बोराखेडी-२, अमडापूर-२, चिखली-२, मलकापूर-९, नांदुरा-सात, जळगाव जामोद-१०, हिवरखेड-४, पिंपळगाव राजा-४, शेगाव-५, जलंब-२, देऊळगाव राजा-४, मेहकर-६, तामगाव-४, खामगाव शहर-८, शिवाजीनगर (खामगाव)-१४, खामगाव ग्रामीण-२, अंढेरा-२, किनगाव राजा-४, सिंदखेड राजा-१, साखरखेर्डा-६, लोणार-५ आणि डोणगाव-१ अशा जवळपास ११० मतदान केंद्रावर गेल्या वेळी बारिक लक्ष होते. यापैकी दोन मतदान केंद्र ही संवेदनशील होती.