वॉटर कप स्पर्धा: आर्थिक मदतीसह श्रमदानासाठी सरसावले अनेक हात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 21, 2019 06:26 PM2019-05-21T18:26:29+5:302019-05-21T18:26:44+5:30
एकाकी प्रयत्नांची दखल घेत अनेकांनी आर्थिक मदतीसाठी हात पुढे केला असून श्रमदानासाठीही येथे अनेक जण सरसावले आहेत.
- नविन मोदे
धामणगाव बढे: दुष्काळावर मात करण्यासाठी वॉटर कप स्पर्धेच्या निमित्ताने मोताळा तालुक्यातील दुर्गम भागातील जनुना गावातील गवंडी, टेल, पेंटर आणि एका विद्यार्थ्याने एकत्रीत येत सुरू केलेल्या एकाकी प्रयत्नांची दखल घेत अनेकांनी आर्थिक मदतीसाठी हात पुढे केला असून श्रमदानासाठीही येथे अनेक जण सरसावले आहेत. ३५६ लोकसंख्या असलेल्या जनुना गावातील या चौघांची दुष्काळावर मात करण्यासाठीच्या प्रयत्नांची त्यामुळे आता सर्वत्र चर्चा होत असून अनेकांचे त्यांना पाठबळ मिळत आहे. मागिल वर्षी मोताळा तालुक्यातील सिंदखेड (प्रजा) या अवघ्या दोन हजार ५०० लोकवस्तीच्या गावात गावकºयांनी एकता, परिश्रम व नेकीच्या जोरावर वॉटर कप स्पर्धेत प्रवीण कदम यांच्या नेतृत्त्वात गावकरी एकटवले व राज्यात या गावाने द्वितीय क्रमांक पटकावला होता. पहिल्याच पावसात गाव पाणीदार झाले होते. त्याची दखल घेत जनुना येथील गवंडी काम करणारे श्यामराव कळमकर, टेलरींगचा व्यवसाय करणारे शिवाजी मानकर, पेंटर म्हणून काम करणारे संजय गायकवाड व योगेश मानकर या विद्यार्थ्याने गाव पाणीदार करण्याचा संकल्प करीत वॉटर कप स्पर्धेत सहभाग घेतला. स्पर्धा पूर्व प्रशिक्षण घेत आठ एप्रिल पासून श्रमदानामध्ये त्यांना झोकून दिले. दुष्काळावर मात करण्यासाठी परिस्थितीशी संघर्ष करताना पोटापाण्याची लढाई रोज त्यांच्यासाठी अनिवार्य होतीच. ती करतच स्पर्धेच्या नियमानुसार तालुकास्तरीय पात्रतेसाठी गावाच्या लोकसंख्येच्या प्रमाणातील श्रमदान या चौघांनी विभागून घेतले व दररोज ४७ घनमीटर खोदकाम करण्याच एक प्रकारे विक्रमच त्यांनी केला. यासंदर्भात ५ मे रोजी ‘लोकमत’ने याबाबत वृत्त प्रकाशीत केले आणि या चौघांची दुष्काळावर मात करण्याची जिद्द आणि गावाप्रतीची तळमळीची अनेक संवेदनशील मनांनी दखल घेतली. यामध्ये मिरज येथील सामाजिक कार्यकर्ते तथा सेवानिवृत्त लष्करी अधिकारी विनय पटवर्धन या चौघांच्या संघर्षामुळे प्रभावीत झाले. त्यांनी या गावासाठी त्यांना पन्नास हजाराची मदत केली. त्या पाठोपाठ ‘लोकमत’च्या वृत्ताची दखल घेत संत गाडगेबाबा विचार मंचच्या सुमारे ४५ कार्यकर्त्यांनी जनुना गावात पोहोचत श्रमदानास लागणारे साहित्य, पळा सोबत आणले. सलग चार तास त्यांनी श्रमदान केले व या चार जलयोध्यांचा सत्कार केला. मोताळा तालुक्यातील सामाजिक कार्यकर्ते प्रविण कदम यांनीही जनुना गावासाठी दहा हजार रुपयांची मदत केली. मोताळा तालुका काँग्रेस समितीचे अध्यक्ष अनिल खाकरे यांनी सुद्धा आर्थिक मदत केली. त्यापूर्वी अहमदनगरच्या स्नेहालय या संस्थेने एक लाखाची मदत जनुना गावासाठी केली आहे. इरफान पठाण यांनी या युवकांना श्रमदानासाठी लागणारे साहित्य दिले. आता जनुना येथील या चार योध्यांच्या पाठीशी मोताळा तालुका पाणी फाऊंडेशनची टिम समर्थपणे उभी राहली आहे. त्यामध्ये समन्वयक बिंदिया तेलगोटे, सतीष राठोड, ब्रम्हानंद गिºहे यांचा समावेश आहे. ‘लोकमत’च्या वृत्तामुळे पाठपळ मिळाले ‘लोकमत’च्या वृत्तामुळे आम्हाला पाठबळ मिळाल्याचे संजय गायकवाड यांनी सांगितले. जिद्द, परिश्रमाच्या जोरावर जनुना गाव वॉटरकप स्पर्धेच्या तालुकास्तरीय फेरीसाटी पात्र ठरले आहे. गावासाठी समर्पण, त्याग व टोकाचा संघर्ष करत मनाचा मोठेपणा दाखविणार्या या चार युवकांची ‘अमिरी’ मात्र श्रीमंतांनाही लाजवणारी आहे. त्यांच्या प्रयत्नामुळे दुष्काळावर मात करत जलसंवर्धनाचीही श्रीमंती येत्या काळात हे गाव अनुभवेल यात शंका नसावी.