सुकलेल्या झाडांना पालिकेचे ‘पाणी’; १३ कोटी वृक्ष लागवड योजना वांद्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 1, 2018 06:27 PM2018-12-01T18:27:19+5:302018-12-01T18:27:39+5:30
खामगाव : शहराच्या विविध भागात लावलेल्या वृक्षांची योग्य ती निगा राखल्या जात नसल्याचे चित्र आहे. चक्क सुकलेल्या झाडांना ‘पाणी’ देत, वृक्ष जगविल्याचा खटाटोप सुरू असल्याची वस्तुस्थिती समोर आली आहे.
अनिल गवई।
खामगाव : शहराच्या विविध भागात लावलेल्या वृक्षांची योग्य ती निगा राखल्या जात नसल्याचे चित्र आहे. चक्क सुकलेल्या झाडांना ‘पाणी’ देत, वृक्ष जगविल्याचा खटाटोप सुरू असल्याची वस्तुस्थिती समोर आली आहे.
१३ कोटी वृक्ष लागवड योजनेतंर्गत स्थानिक नगर पालिकेला ३ हजार वृक्षांच्या लागवडीचे उद्दीष्ठ ठरवून देण्यात आले. त्याअनुषंगाने खामगाव नगर पालिकेने शहराच्या विविध भागात वृक्ष लागवड, संगोपन आणि देखभालीसाठी कंत्राट देण्यात आला. या कंत्राटासाठी १४ व्या वित्त आयोगातून विशेष तरतूद करण्यात आली. कंत्राटातील शर्ती व अटी नुसार एकुण लागवड उद्दीष्टाच्या ७० टक्के म्हणजेच २१०० वृक्षांच्या लागवडीचे बिल कंत्राटदाराला अदाही करण्यात आले. कंत्राटदाराने शहराच्या विविध भागात २८०० वृक्षांची लागवड केली. मात्र, या वृक्षाची योग्य ती निगा न राखल्या जात नाही. त्यामुळे बहुतांश वृक्ष सुकली आहेत. या सुकलेल्या वृक्षांना देखील ‘पाणी’ घालत ही वृक्ष रोपटी जीवंत दाखवित देयक काढल्या जात आहे. पालिका प्रशासनाचे याकडे अक्षम्य दुर्लक्ष असल्यामुळे गेल्या काही दिवसांमध्ये जवळपास ७० टक्के वृक्ष रोपट्यांचं देयक काढण्यात आल्याची खात्रीलायक माहिती आहे.
येथे झाली वृक्ष रोपट्यांची लागवड!
शहरातील डी.पी.रोड, स्वामी समर्थ नगर, गोकुल नगर, ओंकारेश्वर स्मशानभूमी, आदर्शनगर रोड परिसरात १४ व्या वित्त आयोगाच्या निधीतून वृक्ष रोपटे लावण्यात आले. ७० टक्के वृक्ष रोपट्यांच्या लागवडीचे देयकही अदा झाले. मात्र, यापैकी बहुतांश वृक्ष सुकली आहे. या सुकलेल्या वृक्षांनाही ‘पाणी’घालत, देयक काढण्यात येत आहे. याकडे पालिका प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याचे दिसून येते.
‘घर-तेथे-झाड’ संकल्पना यशस्वी!
शहरात ‘घर-तेथे-झाड’ही संकल्पना नगर पालिका प्रशासनाच्यावतीने राबविण्यात आली. या संकल्पनेतून दीड हजारावर वृक्ष रोपट्यांचे वितरण पालिकेकडून करण्यात आले. नागरिकांनी उत्स्फूर्तपणे या योजनेला प्रतिसाद दिला. नागरिक आणि विविध शिक्षण संस्था स्वत: या वृक्षांची देखभाल करीत असल्याने, ‘घर-तेथे-झाड’ ही संकल्पना कमालिची यशस्वी ठरल्याचे दिसून येते.
शहराच्या विविध भागात एकुण उद्दीष्टापैकी ९० टक्के वृक्ष रोपट्यांची लागवड करण्यात आली. सुकलेल्या वृक्षाबद्दल माहिती घेण्यात येईल. वृक्ष लागवड, संगोपन आणि वृक्ष रिप्लेसमेंट करून तीन वर्ष देखभालीचा कंत्राटात समावेश आहे. यातील अनेक वृक्षांची रिप्लेसमेंट करण्यात येत आहे. कंत्राटदाराला ७० टक्के वृक्ष लागवडीचे देयक अदा केले आहे.
- शंकर नेहारे, प्रभारी वृक्षाधिकारी, नगर परिषद, खामगाव.