स्वच्छतेवर ‘लोटाधारीं’चे पाणी!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 20, 2017 12:25 AM2017-07-20T00:25:59+5:302017-07-20T00:25:59+5:30
शहर हगणदरीमुक्तीचे स्वप्न भंगणार!
लोकमत न्यूज नेटवर्क
खामगाव : शहर हगणदरीमुक्त करण्यासाठी नगरपालिका जंगजंग पछाडत असताना पालिकेच्या या प्रयत्नांवर ‘लोटाधारी’ पाणी फेरत असल्याचे चित्र शहरातील अनेक भागात दिसून आले. यासंदर्भात ‘लोकमत’च्या चमूने मंगळवारी पाहणी केले असता बाळापूर फ ैल, चांदमारी, किसन नगर आदी भागातील मैदानेच नव्हे, तर पालिकेचे नवनिर्मित भाजी मार्केटही नागरिकांनी सोडलेले नसल्याचे दिसून आले.
स्वच्छ भारत अभियानाच्या धर्तीवर महाराष्ट्र सरकारने स्वच्छ महाराष्ट्र अभियान सुरू केलेले आहे. या अभियानांतर्गत शहरे हगणदीमुक्त करण्याचा शासनाचा प्रयत्न आहे. यात खामगाव नगरपालिकेने सहभागी होत शहर हगणदरीमुक्त करण्याचा प्रयत्न चालविला आहे.
शासनाने ज्यांच्याकडे शौचालय नाही, अशा नागरिकांना कोणत्याही अटी न घालता शौचालय बांधकामाकरिता प्रत्येकी १८ हजार रुपयांचे अनुदान देण्याचा निर्णय घेतलेला आहे. त्यानुसार खामगाव पालिकेने अनेक लाभार्थींना अनुदानसुद्धा उपलब्ध करून दिले; परंतु शासनाकडून अनुदान घेऊनही अनेक लाभार्थींनी शौचालयांचे बांधकाम केलेच नसल्याचे निदर्शनास आलेले आहे.
त्यामुळे खामगाव शहर ‘हगणदरीमुक्त’ करण्याचा पालिकेचा प्रयत्न फोल ठरत असून, पालिकेच्या प्रयत्नांवर लोटा घेऊन बाहेर जाणाऱ्यांकडून पाणी फेरले जात आहे.
उघड्यावर शौचास जाऊन घाण करणाऱ्या व सार्वजनिक आरोग्यास धोका उत्पन्न करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याचे निर्देशसुद्धा शासनाकडून मिळालेले आहेत. त्यानुसार पालिकेने अनुदान लाटूनही शौचालय न बांधणाऱ्यांविरुद्ध पोलीस स्टेशनला तक्रार देऊन गुन्हे दाखल करविले आहेत, तसेच गुड मॉर्निंग पथकाच्या माध्यमातून लोटाधारींची वरात ही काढलेली आहे. एवढे करूनही लोटाधारी सुधरायला तयार नाहीत.
अजूनही शहरातील विविध भागात अनेकजण रोज सकाळी लोटा घेऊन बाहेर जाताना दिसतात.
या भागात करण्यात आली पाहणी
स्वच्छ भारत अभियानांतर्गत स्वच्छ महाराष्ट्र अभियानाच्या अनुषंगाने खामगाव शहर हगणदरीमुक्त करण्याचा प्रयत्न नगर पालिकेकडून होत आहे; मात्र शहरातील बाळापूर फ ैल, शिवाजी नगर परिसर, नवाफैल, चांदमारी, धोबी खदान, शंकर नगर, किसन नगर आदी भागातील मैदानांवर पाहणी केली असता अनेक लोटाधारी उघड्यावर जात असून, संबंधित परिसर अद्याप हगणदरीमुक्त झालाच नसल्याचे दिसून आले.
भाजी मार्केटची दुरवस्था कायमच
शंकर नगर भागातील नवनिर्मित घरकुलांमधील भाजी मार्केटलाही हगणदरीचे स्वरूप आलेले असून, यासंदर्भात ‘लोकमत’ने याअगोदर स्टिंग आॅपरेशन केले होते. नव्याने बांधलेल्या भाजी मार्केटचा वापर लोक शौचालयासारखा करीत असल्याने या ठिकाणी प्रचंड घाण झालेली आहे; पण हा प्रकार उघडकीस आणूनही पालिकेने कोणतीही उपाययोजना केलेली नाही, त्यामुळे येथील हगणदरी अद्याप कायम आहे.