लोणार सरोवर पाणीपातळी मोजण्यात पाण्याचीच अडचण!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 9, 2021 11:36 AM2021-06-09T11:36:07+5:302021-06-09T11:36:16+5:30
Lonar Sarowar : पाणी पातळी मोजण्यासाठी सरोवरामध्ये रेकॉर्ड गेज लावण्यात पाण्याचीच अडचण बुलडाणा पाटबंधारे मंडळासमोर येत आहे.
- नीलेश जोशी
लोकमत न्यूज नेटवर्क
बुलडाणा : लोणार सरोवराचा सूक्ष्मस्तरावरील अभ्यास व सरोवरातील पाण्याची शास्त्रीय दृष्टिकोनातून पाणी पातळी मोजण्यासाठी सरोवरामध्ये रेकॉर्ड गेज लावण्यात पाण्याचीच अडचण बुलडाणा पाटबंधारे मंडळासमोर येत आहे. दरम्यान, या कामासाठी ८ एप्रिल २०२१ रोजीच नाशिक येथील धरण सुरक्षा संस्थेच्या उपकरणे संशोधन विभागाने पाटबंधारे विभागाला अनुषंगिक पत्र दिले होते. मात्र लोणार सरोवरात लावण्यासाठी वेगळ्या पद्धतीचे रेकॉर्ड गेज लागणार असल्याने ते पुन्हा उपकरणे व संशोधन विभागाकडून मागवावे लागणार आहेत.
दुसरीकडे स्वयंचलित पाणी पातळी मापक यंत्र मात्र पाटबंधारे विभागाला यापूर्वीच प्राप्त झाले आहे. परंतु लोणार सरोवराची पाणी पातळी कमी न झाल्यामुळे सरोवरात ते लावण्यात विभागास अडचणी येत आहेत. त्यामुळे सरोवराची पाणीपातळी कमी होण्याची वाट बुलडाणा पाटबंधारे विभाग सध्या बघत आहे. मात्र आता पावसाळा आल्याने या कामात पुन्हा व्यत्यय येण्याची शक्यता आहे.
गेल्या वर्षी ९ जून रोजी लोणार सरोवराचे पाणी हॅलो अर्चिया या सूक्ष्म जीवांनी बिटा कॅराेटीन द्रव्य मोठ्या प्रमाणात सोडल्यामुळे गुलाबी झाले होते. त्यानंतर सरोवर क्षती प्रतिबंध व संवर्धनासाठी नागपूर खंडपीठात दाखल असलेल्या याचिकेच्या अनुषंगाने याची खंडपीठाने गंभीर दखल घेत सुनावणी घेतली होती. त्यावेळी सरोवरातील पाण्याची पातळी कमी-अधिक होण्याचा अद्ययावत डाटा शास्त्रीय दृष्टिकोनातून संकलित करण्याच्या उपाययोजना करण्याचे आदेश खंडपीठाने दिले होते. वन्यजीव विभागाच्या अखत्यारितील या सरोवरात अनुषंगिक बांधकाम करण्याबाबत वन्यजीव विभागाने तातडीने जुलै २०२० मध्ये परवानगी दिली होती.
त्यानुषंगाने नाशिकच्या धरण सुरक्षा संघटनेच्या उपकरणे व संशोधन विभागाकडून रेकॉर्ड गेज पट्ट्या व स्वयंचलित पाणी पातळी मापक उपकरणे पाठविण्यात आली होती. मात्र प्रचलित पद्धतीच्या या पाणी मापक पट्ट्या अधिक जाडीच्या लागणार असल्याने त्या पुन्हा बोलावण्यात आल्या आहेत. स्वयंचलित उपकरण सध्या मेहकर येथील पाटबंधारे विभागामध्ये ठेवण्यात आलेले आहे.
सासू-सुनेची विहीर महत्त्वपूर्ण
लोणार सरोवराची पाणीपातळी कमी झाल्यानंतर सरोवरात असलेली सासू-सुनेची विहीर ही उघडी पडते. या विहिरीच्या परिसरात रेकॉर्ड गेज पट्ट्या लावाव्या लागणार आहेत. तसेच सरोवराच्या मध्यभागी सेन्सर असलेले स्वयंचलित पाणी पातळी मापक उपकरण लावावे लागणार आहे. मात्र यावर्षी सरोवराची पाणी पातळी कमी झालेली नाही. त्यामुळे तेथे ही कामे करणे पाटबंधारे विभागाला जिकरीचे ठरत असल्याचे पाटबंधारे विभागाच्या सूत्रांनी सांगितले. यापूर्वी २०१८ मध्ये ही सासू-सुनेची विहीर पाणी कमी झाल्यामुळे उघडी पडली होती. त्यापूर्वी १९९८ मध्ये ती दृष्टिपथास पडली होती.
पाण्याचा रंग बदलण्यास झाले वर्ष पूर्ण
सरोवरातील पाणी गुलाबी होण्यास ९ जून रोजी एक वर्ष पूर्ण झाले आहे. त्यातच मुख्यमंत्र्यांनी फेब्रुवारी महिन्यात सरोवर विकासाला प्राधान्याची घोषणा करत निधी उपलब्ध करण्यात येईल, असे स्पष्ट केले होते. त्यानुषंगाने माहिती घेतली असता उपरोक्त बाब समोर आली.