लोणार सरोवरातील पापहरेश्वर धारेला पाच वर्षानंतर पाणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 29, 2019 01:51 PM2019-10-29T13:51:39+5:302019-10-29T13:51:47+5:30
पापहरेश्वर धारतिर्थला पाणी आल्याने पाहण्यासाठी भाविक, पर्यटन प्रेमी नागरिकांची गर्दी वाढली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
लोणार: लोणार सरोवरातील पाच वर्षापासून आटलेल्या पापहरेश्वर धारेला पुन्हा पाणी आले असून २६ आॅक्टोबर पासून येथील झरा पुन्हा वाहू लागला आहे. सरोवरातील रामगया झरा हा गेल्या दहा वर्षापासून आटलेला आहे. त्या पाठोपाठ पापहरेश्वर धारही आटली होती. मात्र गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे या धारेला पुन्हा पाणी आले आहे.
शासकीय विश्राम गृहापासून सरोवरात पायऱ्यांनी खाली उतरल्यानंतर सुरुवातीलाच हेमाडपंती पश्चिम मुखी रामगया मंदिर दिसते. तीनव्द्वार असलेल्या ह्या मंदिरात रामाची मूर्ती असून बाजूलाच श्रीरामेश्वर मंदिर आहे. ह्या मंदिराच्या समोरच रामकुंड बुजलेल्या स्थितीत दिसून येतो. थोडे खाली उतरले की, नऊ वर्षापूर्वी अखंड वाहणारा स्वच्छ व शुद्ध पाण्याचा रामगया नावाने प्रसिद्ध असलेला झरा आटलेल्या स्थितीत दिसून येतो. जागतिक पर्यटन स्थळ लोणार सरोवर पाहण्यासाठी येणारे देश-विदेशातील पर्यटक व अनेक शैक्षणिक सहली आल्यानंतर ह्याच मार्गाने सरोवर पाहण्यासाठी उतरत होते. एकेकाळी हजारो पर्यटकांची तहान भागवणारा रामगया झरा आज मात्र स्वत: च पाण्याच्या प्रतीक्षेत व्याकुळलेला दिसून येत आहे. निसर्गाचा आनंद घेण्यासाठी येणारे हजारो पर्यटक रामगया मंदिर परिसरात थांबत होते. झºयातील पाणी गोड असल्याने ह्याच ठिकाणी पर्यटक मेजवानी करत आणि विसावा घेत. विद्यार्थी याच झºयातील पाण्यावर आपली तहान भागवत सहलीचा आनंद घेत. परंतु अनेकांची तहान भागवणारा रामगया झराच गेल्या दहा वर्षापासून तहानलेला आहे. रामगया झºयाच्या पाठोपाठ गेल्या पाच वर्षापासून पापहरेश्वर धार हि आटलेली होती. महाराष्ट्र भरातून अनेक भाविक अस्थी विसर्जन करण्यासाठी येथे येत होते. त्यानंतर ह्याच ठिकाणी अनेक धार्मिक विधी केल्या जात होते. ह्या धारेचेही पाणी गोड होते. अखंड वाहणारे पापहरेश्वर धार तीर्थ गेल्या पाच वर्षापासून आटलेले होते. यावर्षीच्या पावसामुळे पापहरेश्वर धारेला पाणी आले आहे. पापहरेश्वर धारतिर्थला पाणी आल्याने पाहण्यासाठी भाविक, पर्यटन प्रेमी नागरिकांची गर्दी वाढली आहे.
(प्रतिनिधी)