पूर्णा नदीच्या पुलावरून पाणी: जळगाव-नांदुरा वाहतूक बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 8, 2021 11:30 AM2021-09-08T11:30:15+5:302021-09-08T11:30:23+5:30
Flood to Purna River : जळगाव जामोद तालुक्यातील मानेगाव येथील पूर्णा नदीला मोठा पूर आला असून, जळगाव जामोद नांदुरा वाहतूक बंद पडली आहे.
- जयदेव वानखडे
जळगाव जामोद: गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे जळगाव जामोद तालुक्यातील मानेगाव येथील पूर्णा नदीला मोठा पूर आला असून, जळगाव जामोद नांदुरा वाहतूक बंद पडली आहे.
अमरावती, अकोला आणि बुलढाणा जिल्ह्यातील अनेक नद्या पूर्णा नदीला मिळत असल्याने या नदीला नेहमी मोठे पूर येतात. त्यातच गेल्या तीन दिवसापासून संपूर्ण विदर्भात पाऊस कोसळत आहे. त्यामुळे या नदीला मोठा पूर आला असून जळगाव जामोद तालुक्याचा संपर्क तुटला आहे. सध्या मानेगाव येथील पुलावरून 5 फूट पाणी वाहत आहे. त्यामुळे वाहनांचे वाहतूक ठप्प झाली आहे. तर आता बाहेर जायचे असल्यास मुक्ताई नगर मार्गे तसेच शेगाव मार्गे जाण्याचा मार्ग मोकळा आहे. परंतु हा मार्ग खूप फेऱ्या चा असल्याने प्रवाशांना आर्थिक भुर्दंड बसतो.
नवीन पुल केव्हा चालू होणार.
पूर्णा नदीच्या पात्रावर मानेगाव येथे नवीन पुलाचे बांधकाम पूर्ण झालेले आहे. परंतु पोच रस्त्याचे काम गेल्या दोन वर्षापासून संथगतीने सुरू आहे. त्यामुळे पावसाळ्यात पूर्णा नदीच्या पुलावरून पाणी जाते. तेव्हा मात्र वाहतूक बंद होऊन तालुक्याचा जिल्ह्याशी संपर्क तुटून जातो. अशा परिस्थितीत नवीन पूल सुरू झाल्यास वाहतूक पूर्ववत राहून जिल्ह्याशी संपर्क राहतो. त्यामुळे सदर पुल तात्काळ सुरू करण्यात यावा. अशी मागणी जनतेमधून होत आहे.