जल पुनर्भरण कागदावरच!
By Admin | Published: July 2, 2016 01:11 AM2016-07-02T01:11:25+5:302016-07-02T01:11:25+5:30
लोणार नगरपालिकेचे होते दुर्लक्ष : पावसाचे पाणी जाते वाहून!
लोणार (जि. बुलडाणा) : नवीन बांधकामांना परवानगी देताना जल पुनर्भरण करणे आवश्यक आहे. त्याशिवाय नवीन बांधकामांना पालिकेने परवानगीच देऊ नये, असा सक्त नियम असताना लोणार पालिकेचे याकडे सर्रास दुर्लक्ष होत असून, परिणामी पावसाचे पडलेले पाणी वाहून जाते. नवीन बांधकाम करताना प्रत्येक मालमत्ताधारकांना जलपूनर्भरण करणे बंधनकारक करण्यात आले आहे. लोणार शहरात जलपुनर्भरण करणार्यांची संख्या अगदी बोटावर मोजण्याइतकीच आहे. परिणामी वर्षभर पाण्याचा वारेमाप वापर करणार्या नागरिकांकडून पाण्याची कुठलीच बचत होत नाही.
लोणार नगरपालिकेच्या हद्दीत ५ हजार ४0३ मालमत्ताधारकांची संख्या आहे. तथापि शहरात जल पुनर्भरण करणार्या मालमत्ताधारकांची आकडेवारी एक टक्कासुद्धा नाही. शहरात पाणीपुरवठा करणार्या धरणातील पाणी साठा झपाट्याने कमी झाल्याने यावर्षी शहराला १00 दिवसानंतर पाणीपुरवठा झाला नाही.
त्यामुळे शहरवासीयांना पाण्यासाठी भटकंती करावी लागली. शहरात पिण्याच्या पाण्याचा यावर्षी गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. यावर्षी शहरासह जिल्ह्यात पिण्याच्या पाण्याचा प्रश्न ऐरणीवर आल्याने जल पुनर्भरणाचा विषय समोर आला. त्यामुळे शासनाने जलयुक्त शिवारसारख्या योजना राबविण्यावर भर दिला. तर १ जुलै रोजी दोन कोटी वृक्ष लागवडीचा प्रकल्प शासनाने हाती घेतल्यामुळे जिल्हाभरातील लाखो नागरिकांनी वृक्ष लागवड केली. मात्र पालिका जल पुनर्भरण न करणार्या लोकांना का पाठीशी घालते, हा प्रश्नच आहे.
..तर अधिकारी व मालमत्ताधारक जबाबदार
एकीकडे शासन ह्यपाणी आडवा पाणी जिरवाह्ण योजना वेगवेगळ्या माध्यमातून राबवित असताना नगरपालिका मात्र जल पुनर्भरणसारख्या उपक्रमाकडे दुर्लक्ष करीत आहे. भविष्यात ज्या मालमत्ताधारकांनी आपल्या बांधकामावर जल पुनर्भरण केले नाही, अशा व्यक्तीला व त्याच्या बांधकामाला परवानगी देणार्या पालिकेच्या अधिकार्याला जबाबदार धरावे, अशी मागणी होत आहे.