बुलडाणा जिल्ह्यातील ६५ गावातील पाणीनमुने दुषीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 28, 2020 12:48 PM2020-08-28T12:48:59+5:302020-08-28T12:49:07+5:30
४२ टक्के उद्भवामध्ये नायट्रेटसह आर्यन व अन्य मुलद्रव्यांचे प्रमाण तुलनेने अधिक आढळून आले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
बुलडाणा: जिल्ह्यातील सुमारे सात हजार पाणी उद्भवापैकी निम्म्या उद्भवातील पाणी नमुन्यांची तपासणी करण्यात आली असून त्यातील ४२ टक्के उद्भवामध्ये नायट्रेटसह आर्यन व अन्य मुलद्रव्यांचे प्रमाण तुलनेने अधिक आढळून आले आहे. त्यातच ६५ गावातील पाणी नमुने हे दुषीत आढळून आले आहे.
पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाच्या सहकार्याने भुजल सर्व्हेक्षण विभागाने जिल्ह्यातील सहा हजार ८४१ पाण्याच्या उद्भवापैकी तीन हजार ४४३ उद्भवातील पाण्याचे नमुने गोळा केले होते. त्यापैकी प्रत्यक्षात ३, ६१० पाणी नमुन्यांची रासायनिक तपासणी भुजल सर्व्हेक्षण विभागाने केली तेव्हा यापैकी १,४५३ अर्थात ४२ टक्के पाणी नमुने पिण्याच्या दृष्टीने अयोग्य असल्याचा निष्कर्ष निघाला आहे. विशेष म्हणजे या पाण्यात आयर्न व नायट्रेटचे प्रमाण अधिक आढळून आले आहे. घातक फ्लोराईडचे प्रमाण मात्र या पाण्यात नसल्याचे स्पष्ट झाले आहे.
प्रामुख्याने पाण्याची अनुजैविक आणि रासायनिक तपासणी दरवर्षी मान्सूनपूर्व व मान्सून पश्चात करण्यात येत असते. त्यानुषंगाने बुलडाणा जिल्ह्यात नागरिक ज्या पाणी उद्भवातून पाणी दैनंदिन गरजांसाठी वापरतात तेथील पाण्याचे नमुने पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाने संकलीत केले होते. भुजल सर्वेक्षण विभागाच्या माध्यमातून त्यांची तपासणी करण्यात आली असता त्यात ४२ टक्के पाणी नमुने हे अनफीट अर्थात पिण्यास अयोग्य असल्याचे समोर आले होते.
या तालुक्यात आयर्न, नायट्रेटचे प्रमाण अधिक
जळगाव जामोद व संग्रामपुर तालुक्यातील १७४ आणि १७७, चिखली तालुक्यातील २०० तर बुलडाणा तालुक्यातील १२९ ठिकाणच्या पाणी नमुन्यामध्ये नायट्रेटसह आयर्नचे तथा अन्य मुलद्रव्याचे प्रमाण हे निर्धारीत निकषापेक्षा अधिक आढळून आले आहे. त्यामुळे एकूण तपासण्यात आलेल्या पाणी नमुन्यांपैकी ४२ टक्के पाणी नमुने हे पिण्यास अयोग्य असल्याचे स्पष्ट झाले आहे. परिणामी आता ग्रामीण भागातील या पाण्याच्या उद्भवांचे शुद्धीकरण करणे गरजेचे झाले आहे.
नऊ टक्के ग्रामपंचायतीमधील पाणी दुषीत
आरोग्य विभागाच्या माध्यमातूनही तपासण्यास आलेल्या पाणी नमुन्यांची शहानिशा करण्यात आली असता नऊ टक्के ग्रामपंचायतीमधील पाणी हे दुषीत आढळून आले आहे. यात प्रामुख्याने एकट्या मोताळा तालुक्यातील ११ ग्रामपंचायतींचा समावेश असून बुलडाणा तालुक्यातील आठ, मेहकर आणि नांदुरा तालुक्यातील सात गावांचा यात समावेश आहे.