बुलडाणा जिल्ह्यातील १0१ गावांवर पाणी टंचाईचे सावट!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 7, 2017 12:44 AM2017-12-07T00:44:04+5:302017-12-07T00:47:01+5:30

 पाणीटंचाईची तीव्रता जिल्ह्यात वाढत असून, जानेवारीमध्ये लोणार शहरासह ग्रामीण भागातील जवळपास १0१ गावांना टँकरद्वारे पाणी पुरवठा करावा लागण्याची साधार भीती व्यक्त होत आहे. त्यादृष्टीने पाणीटंचाई निवारण कक्षाने उपाययोजना प्रस्तावित केल्या आहेत.

Water scarcity in 101 villages of Buldhana district! | बुलडाणा जिल्ह्यातील १0१ गावांवर पाणी टंचाईचे सावट!

बुलडाणा जिल्ह्यातील १0१ गावांवर पाणी टंचाईचे सावट!

Next
ठळक मुद्दे१९ कोटींचा आराखडा  ६७ लाखांचे अनुदान प्रलंबित

लोकमत न्यूज नेटवर्क
बुलडाणा :  पाणीटंचाईची तीव्रता जिल्ह्यात वाढत असून, जानेवारीमध्ये लोणार शहरासह ग्रामीण भागातील जवळपास १0१ गावांना टँकरद्वारे पाणी पुरवठा करावा लागण्याची साधार भीती व्यक्त होत आहे. त्यादृष्टीने पाणीटंचाई निवारण कक्षाने उपाययोजना प्रस्तावित केल्या आहेत. दरम्यान, जिल्ह्याचा पाणीटंचाई निवारण कृती आराखडा १९ कोटींच्या घरात गेला असून, गत वर्षीचे ५६ लाख रुपयांचे अनुदान प्रलंबित आहे. अद्याप बुलडाणा जिल्ह्यास चालू वर्षासाठी टंचाई निवारणासाठी अनुदान प्राप्त झाले नसल्याची माहिती आहे.
दरम्यान, जिल्ह्यातील ७९७ गावांचा टंचाई आराखड्यात समावेश करण्यात आला असून, १८ कोटी ९४ लाख रुपयांचा खर्च उपाययोजनांवर होणार आहे. सध्याच्या स्थितीत टंचाईची कामे करण्यासाठी ११ लाख तीन हजार रुपयांची आवश्यकता असून, प्रशासनाला अद्याप त्यासाठी निधी उपलब्ध झालेला नाही. त्यातच गेल्या वर्षीचे टंचाई उपाययोजनांसाठीचे ५५ लाख ७७ हजार रुपयांचे अनुदान प्रलंबित आहे. जिल्ह्यात वार्षिक सरासरीच्या १0७ टक्के पाऊस झाला असला तरी प्रकल्पांमधील जलसाठय़ात तुलनेने पाणीसाठा कमी आहे. नागरी आणि ग्रामीण भागाचा पाणी पुरवठा असलेल्या प्रकल्पांमध्येच प्रामुख्याने पाणीसाठा कमी आहे. त्यामुळे येत्या काळात जिल्ह्यातील जवळपास १0१ गावांना टँकरद्वारे पाणीपुरवठा करावा लागण्याची शक्यता आहे.  त्यादृष्टीने १0७ उपाययोजना प्रस्तावित केल्या असून, वर्तमान स्थितीत चिखली तालुक्यातील मेरा बुद्रूक या गावात एक टँकर सुरू आहे. सोबतच टंचाईची दाहकता वाढत असताना ३७ गावातील ३९ विहिरी पिण्याच्या पाण्यासाठी अधिग्रहीत करण्यात आल्या असल्याचे सूत्रांनी सांगितले. जिल्ह्याचा टंचाई आराखडा हा १८ कोटी ९४ लाखांच्या घरात असून, गतवर्षीच्या तुलनेत तो दहा कोटींनी कमी आहे.
वर्तमान स्थितीत  ६५३ गावात ७१९ उपाययोजना प्रस्तावित करण्यात आल्या आहेत. यात प्रामुख्याने टंकरद्वारे पाणी पुरवठा करण्यासाठी पाच कोटी ८८ लाख रुपयांचा खर्च अपेक्षीत असून, १0१ गावात जानेवारी अखेर जिल्ह्यात टँकरद्वारे पाणी पुरवठा करावा लागण्याची शक्यता सूत्रांनी व्यक्त केली.

२११ गावात विंधन विहिरी
टंचाईच्या पार्श्‍वभूमीवर २११ गावात विंधन विहिरी घेणे प्रस्तावित असून, त्यासाठी दोन कोटी सात लाख ६५ हजार रुपये खर्च अपेक्षित आहे. त्यातच ८७ नळ योजनांच्या दुरुस्तीची गरज असून, चार कोटी ३५ लाख रुपये खर्च त्यास अपेक्षित आहे. जानेवारीपासूनच जिल्ह्यात टंचाईची दाहकता वाढण्यास प्रारंभ होणार आहे. त्या दृष्टीने यंत्रणा सध्या सतर्क झाली आहे.

प्रकल्पातील जलसाठा
जिल्ह्यातील छोट्या, मोठय़ा आणि मध्यम प्रकल्पांची महत्तम साठवण क्षमता ५३३.५६ दलघमी आहे. प्रत्यक्षात या प्रकल्पांमध्ये १७४.१0 दलघमी पाणीसाठा आजच्या स्थितीत शिल्लक आहे. टक्केवारीमध्ये तो ३२ टक्क्यांच्या आसपास येतो. शहरी तथा ग्रामीण भागासाठी जवळपास ४0 दलघमी पाणीसाठा आरक्षित करण्यात आलेला आहे. त्यातच प्रकल्पातून शेती सिंचनासाठीही पाणी सोडण्याची मागणी होत असल्याने प्रसंगी शेतीसाठी एक किंवा दोन आवर्तने दिली जाऊ शकतात, असा प्रशासनाचा अंदाज आहे.

लोणारमध्ये जानेवारीतच टंचाई!
लोणार शहरात जानेवारी, फेब्रुवारी महिन्यातच टंचाईची तीव्रता वाढणार असून, या शहरास टँकरद्वारे पाणी पुरवठा करावा लागणार आहे. शहरी भागातील साडेपाच लाख नागरी लोकसंख्येच्या पाण्याचा प्रश्न सोडविण्याच्या दृष्टीनेही प्रयत्न झाले आहे. त्यानुषंगाने २0 नोव्हेंबर रोजीच चिखली शहरातील शुद्ध, अशुद्ध पाण्याची जलवाहिनी दुरुस्त करण्यात आली असून, इंटक वेलमधील गाळ काढणे, पंपींग मशीन ठिकाणी नवीन ट्रान्सफार्मर बसविण्यात आले आहे. त्यासाठी दोन कोटी ७९ लाख १६ हजार रुपये खर्च झाला असल्याचे सूत्रांनी सांगितले. शहरी भागातील उपाययोजनांसाठी दोन कोटी ५३ लाख रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. 

Web Title: Water scarcity in 101 villages of Buldhana district!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.