जिल्ह्यातील ६६ गावांत पाणीटंचाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 17, 2021 04:34 AM2021-04-17T04:34:44+5:302021-04-17T04:34:44+5:30
यावर्षी तुलनेने पाऊस चांगला झाला होता. त्यामुळे डिसेंबरअखेर जिल्ह्यात फारशी पाणीटंचाई जाणवली नव्हती. मात्र, आता दुसऱ्या टप्प्यात जिल्ह्यात टंचाईची ...
यावर्षी तुलनेने पाऊस चांगला झाला होता. त्यामुळे डिसेंबरअखेर जिल्ह्यात फारशी पाणीटंचाई जाणवली नव्हती. मात्र, आता दुसऱ्या टप्प्यात जिल्ह्यात टंचाईची दाहकात वाढत असून त्यादृष्टीने पाणीटंचाई निवारण विभागाने उपाययोजनांवर भर दिला आहे. त्याअंतर्गत उपरोक्त गावांना टँकर व विहीर अधिग्रहणाद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे.
यंदाच्या उन्हाळ्यात ६८७ गावांत पाणीटंचाई निर्माण होण्याची शक्यता यंत्रणेने व्यक्त केली आहे. त्यासाठी ९५६ विविध उपाययोजना सुचविण्यात आल्या आहेत. त्यासाठी १६ कोटी रुपयांचा टंचाई निवारण कृती आराखडा तयार करण्यात आला आहे. सध्याच्या घडीला पिंपरखेड, ढासाळवाडी, हनवतखेड, सावळा (ता. बुलडाणा), असोला तांडा, सैलानीनगर, कोलारा (चिखली), सावरगाव माळ (सिंदखेडराजा) आणि चिंचखेडनाथ इसालवाडी (ता. मोताळा) या गावांना टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे. थोडक्यात जिल्ह्यातील जवळपास २० हजार लोकसंख्या ही टँकरच्या पाण्यावर अवलंबून असल्याचे चित्र आहे.
--५२ लाख ८५ हजारांचा खर्च--
जिल्ह्यातील पाणीटंचाई निवारणासाठी आतापर्यंत ५० लाख रुपयांचा खर्च झाला असून ५७ गावांची तहान ६० विहिरी अधिग्रहीत करून भागविण्यात येत आहे. त्यावर आतापर्यंत २० लाख ६३ हजार रुपयांचा खर्च झाला आहे, तर नऊ गावांतील पाण्याच्या टँकरवर ३२ लाख २२ हजार रुपये खर्च झाला आहे. दरम्यान, येत्या काळात जिल्ह्यातील ग्रामीण भागात आणखी काही गावांना टँकरद्वारे पाणीपुरवठा करावा लागण्याची शक्यता व्यक्त होत आहे. त्यादृष्टीने पाणीटंचाई निवारण विभाग नियोजन करत आहे.