बुलडाणा जिल्ह्याचा पाणी टंचाई कृती आराखडा पाच कोटींचा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 20, 2019 03:08 PM2019-12-20T15:08:29+5:302019-12-20T15:08:34+5:30
या आराखड्यात जिल्ह्यातील ४३९ गावांसाठी ५१८ योजना प्रस्तावित करण्यात आल्या आहेत.
- सोहम घाडगे
लोकमत न्यूज नेटवर्क
बुलडाणा : जिल्ह्यात वार्षिक सरासरीच्या २२ टक्के जादा पाऊस पडल्याने गतवर्षीच्या तुलनेत टंचाईची तीव्रता कमी राहण्याची शक्यता आहे. यंदाच्या टंचाई कृती आराखड्यात त्याचे प्रतिबिंब दिसून आले आहे. जिल्ह्याचा टंचाई कृती आराखडा अवघ्या पाच कोटी रुपयांच्या आसपास आहे. गतवर्षी अवर्षण स्थितीमुळे जिल्ह्यात ४४ कोटी रुपयांपेक्षा अधिक खर्च टंचाई निवारणाच्या कामावर करावा लागला होता.
जिल्ह्यात यावर्षी दमदार पाऊस झाल्यामुळे मुबलक पाणी उपलब्ध असून परिस्थिती समाधानकारक आहे. मात्र जिल्ह्यातील काही मंडळांमध्ये तुलनेत कमी पाऊस झाला आहे. परिणामी, या जिल्ह्यातील या भागामध्ये येणाऱ्या काळात पाणीटंचाईची स्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. भविष्यातील पाणीटंचाईचे संकट पाहता सुमारे पाच कोटी रुपयांचा पाणीटंचाई कृती आराखडा तयार करण्यात आला आहे. या आराखड्यामध्ये जून २०२० पर्यंत उपाययोजना सुचविण्यात आल्या आहेत. या आराखड्यामध्ये आॅक्टोबर ते डिसेंबर २०१९, जानेवारी २०२० ते मार्च २०२० आणि एप्रिल २०२० ते जून २०२० असे तीन टप्पे करण्यात आले आहेत. त्यानुसार नवीन विंधन विहिरी तयार करणे, नळ योजनांची विशेष दुरुस्ती करणे, नवीन नळ योजना करणे, टँकरने पाणीपुरवठा करणे, विहिरींचे अधिग्रहण करून गाळ काढणे आदी कामे सुचविण्यात आली आहेत.
या आराखड्यात जिल्ह्यातील ४३९ गावांसाठी ५१८ योजना प्रस्तावित करण्यात आल्या आहेत. त्यासाठी सुमारे ४ कोटी ७३ लाख ३२ हजार रुपयांची तरतूद केली आहे.
जिल्ह्यातील ३५१ गावांमधील ३६० खासगी विहीर अधिग्रहीत करण्यात येणार असून त्याकरिता १ कोटी ४७ लाख ९२ हजार रुपयांचे नियोजन केले आहे. टँकरद्वारे २१ गावांना पाणीपुरवठा करण्याची गरज भासण्याची शक्यता आहे. एप्रिल ते जून २०२० दरम्यान टँकरची संख्या वाढवावी लागणार असून टँकरद्वारे पाणीपुरवठ्यासाठी १ कोटी ११ लाख ४५ हजार रुपयांचा खर्च येणार आहे. अनेक गावातील नळयोजना जुनाट झालेल्या आहेत. वाढत्या लोकसंख्येचा भार सहन करण्यासाठी त्याठिकाणी नळ योजनेची दुरुस्ती करण्याची आवश्यकता आहे. जिल्ह्यातील २२ गावांमध्ये नळयोजनेची विशेष दुरुस्तीची कामे कृती आराखड्यात समाविष्ट करण्यात आली आहेत. त्यासाठी १ कोटी १० लाख रुपयांचे नियोजन केले आहे. संभाव्य पाणीटंचाई लक्षात घेऊन जिल्हाधिकारी कार्यालयाने जून महिन्यांपर्यंत पाणीटंचाई निवारणासाठी तयार करण्यात येणाºया विविध योजनांवरील संभाव्य खर्चाची माहिती शासनाकडे पाठविली आहे.
९९ गावांमध्ये ११२ विंधन विहिरी
विंधन विहीर जिल्ह्यातील पाणीपुरवठ्याचा महत्वाचा स्त्रोत आहे. मोठ्या प्रमाणावरील लोकसंख्येची पाण्याची गरज त्याद्वारे भागविली जाते. दुष्काळात नेहमीच विंधन विहिरींचा आधार राहिला आहे. त्याकरिता दरवर्षी विंधन विहिरी घेणे, विंधन विहिरींची दुरुस्ती करण्याची कामे करण्यात येतात. यंदाच्या कृती आराखड्यात ९९ गावांमध्ये ११२ नवीन विंधन विहिरी घेण्यासाठी खर्चाचे नियोजन केले आहे. त्यासाठी ७३ लाख ९५ हजारांचा आराखडा सादर केला आहे.
तीन तात्पुरत्या पुरक नळ योजना
तीन गावांमध्ये तात्पुरत्या पुरक नळ योजनेची तरतूद केली आहे. त्यासाठी ३० लाख रुपये खर्चाचे नियोजन केले आहे. दुष्काळी परिस्थितीत पाणीटंचाईवर मात करण्यासाठी तात्पुरती पुरक नळ योजनेचे नियोजन प्रशासनाकडून केले जाते. यंदा तीन तात्पुरत्या पुरक नळ योजनांसाठी ३० लाख रुपये खर्चाचे नियोजन केले आहे.