ग्रामीण रुग्णालयात पाणीटंचाई
By admin | Published: July 1, 2016 12:27 AM2016-07-01T00:27:10+5:302016-07-01T00:27:10+5:30
मेहकर ग्रामीण रुग्णालयात दुर्गंंधीमुळे रुग्णांचे हाल; पाणी घ्यावे लागते पाणी.
मेहकर (जि. बुलडाणा) : येथील शासकीय ग्रामीण रुग्णालयामध्ये गेल्या अनेक दिवसांपासून पाण्याची तीव्र टंचाई आहे. पाणी नसल्याने स्वच्छतेचे तीन-तेरा वाजले असून, दुर्गंंधीमुळे रुग्णांचे हाल होत आहेत. रुग्णालय प्रशासनाने टँकरने पाणी विकत घेऊन तात्पुरती व्यवस्था केली आहे. येथील ग्रामीण रुग्णालयामध्ये गेल्या अनेक दिवसांपासून पाण्याची सुविधा उपलब्ध नाही. त्यामुळे रुग्णालयात घाणीचे साम्राज्य पसरले आहे. शौचालय, पोस्टमार्टम विभाग, तथा रुग्णालयात पाण्याअभावी साफसफाई होत नसल्याने सर्वत्र घाण व दुर्गंंधी पसरली आहे. या रुग्णालयात शहर व ग्रामीण भागातून गोरगरीब रुग्ण मोठय़ा प्रमाणात उपचारासाठी येत असतात. अनेक रुग्णांना उपचारासाठी रुग्णालयात मुक्कामी रहावे लागते; परंतु या रुग्णालयात पाणी नसल्याने रुग्णांचे हाल होत आहेत. रुग्णालयात तथा परिसरामध्ये स्वच्छतेचा अभाव असल्याने घाणीमुळे मच्छरांचे प्रमाणही वाढत आहे. त्यामुळे अनेक रुग्णांना साथीच्या आजाराचा सामना करावा लागत आहे. रुग्णालयाच्या अधिकार्यांनी टँकरने पाणी विकत घेऊन तात्पुरती व्यवस्था केली असली, तरी पुरेसे पाणी नसल्याने रुग्ण त्रस्त झाले आहेत. सामान्य रुग्णालयाच्या पाणी पुरवठय़ाकडे नगरपालिकेचे सातत्याने दुर्लक्ष होते. यासंदर्भात रुग्णालय प्रशासन पत्रव्यवहार करूनसुद्धा त्याला केराची टोपली दाखविल्या जाते.