पाण्यासाठी फेब्रुवारीपासूनच टँकरचा आधार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 17, 2020 03:40 PM2020-02-17T15:40:46+5:302020-02-17T15:41:53+5:30

गेल्या २० ते २५ दिवसांपासून पाणीपुरवठा न झाल्याने नागरिकांना टँकरचा आधार घ्यावा लागत आहे.

Water scarcity in Sunderkheda village; Tanker for water in February | पाण्यासाठी फेब्रुवारीपासूनच टँकरचा आधार

पाण्यासाठी फेब्रुवारीपासूनच टँकरचा आधार

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
बुलडाणा : जिल्ह्यातील सर्वात मोठी ग्रामपंचायत असलेल्या सुंदरखेड येथील नागरिकांना आतापासूनच पाणीटंचाईच्या झळा सोसाव्या लागत आहेत. गेल्या २० ते २५ दिवसांपासून पाणीपुरवठा न झाल्याने नागरिकांना टँकरचा आधार घ्यावा लागत आहे. यामुळे नाहक आर्थिक भूर्दंड सहन करावा लागत असून या प्रकाराकडे ग्रामपंचायत प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे.
बुलडाणा शहर व परिसरातील काही गावांसह सुंदरखेड गावाला पाणीपुरवठा करणाऱ्या येळगाव धरणामध्ये पुरेसा जलसाठा आहे. मात्र तरीदेखील नागरिकांना नेहमीच विलंबाने पाणीपुरवठा केल्या जातो. हिवाळा असो की पावसाळा १५ दिवसाच्या आधी कधीच पाणीपुरवठा होत नाही. उन्हाळ्यात तर २० ते २५ दिवसांवर तर कधी चक्क महिनाभराने पाणीपुरवठा होते. यामुळे उन्हाळाभर नागरिकांना टँकर विकत घ्यावे लागते. सध्या गेल्या २० ते २५ दिवसांपासून नळाद्वारे पाणी सोडण्यात आले नाही. यामुळे उन्हाळा सुरू होण्यापूर्वीच नागरिकांना टँकरचा आधार घ्यावा लागत आहे. यामुळे नियमितपणे ग्रामपंचायतीचे सर्व कर चुविणाऱ्यांमध्ये रोष व्यक्त होत आहे.
पाणीपुरवठ्याबाबत नागरिकांनी संबंधित कर्मचाºयास विचारणा केल्यास नेहमीच पाइप फुटला असल्याचे कारण समोर करण्यात येते. मुळात ग्रामपंचायत प्रशासनाकडून पाणीपुरवठ्याबाबत योग्य नियोजनच करण्यात येत नाही. शहराला लागून असल्याने गावाची लोकसंख्या खूप मोठी आहे. एवढ्या मोठ्या लोकांना पाणीपुरवठा करण्यासाठी विभागनिहाय दिवस ठरवून योग्य त्या वेळी पाणीपुरवठा करणे गरजेचे आहे. नियमित कर भरूनही ग्रामपंचायतीकडून आवश्यक असलेल्या इतर सुविधादेखील मिळत नसल्याच्या तक्रारी नागरिकांकडून वारंवार होतात. काही भागातील पथदिवे सतत बंद असून काही ठिकाणी रस्त्यांचीदेखील खस्ता हालत झाली आहे. या सर्व समस्यांकडे ग्रामपंचायत प्रशासनाने तातडीने लक्ष देण्याची गरज सध्याच्या परिस्थितीत निर्माण झाली आहे.
यासंदर्भात सरपंच अपर्णा चव्हाण यांची प्रतिक्रीया जाणून घेण्याचा प्रयत्न केला असता संपर्क होऊ शकला नाही.
 

Web Title: Water scarcity in Sunderkheda village; Tanker for water in February

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.