टंचाई निवारणासाठी चार गावांना टँकरने पाणीपुरठा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 23, 2019 05:54 PM2019-02-23T17:54:42+5:302019-02-23T17:54:48+5:30
बुलडाणा: मार्च महिन्याच्या तोंडावर जिल्ह्यात टंचाईची तीव्रता वाढत असून टंचाईग्रस्त गावांना टँकरद्वारे पाणी पुरवठा करावा लागल आहे.
बुलडाणा: मार्च महिन्याच्या तोंडावर जिल्ह्यात टंचाईची तीव्रता वाढत असून टंचाईग्रस्त गावांना टँकरद्वारे पाणी पुरवठा करावा लागल आहे. त्यानुषंगाने आता आणखी चार गावांना टँकरने पाणीपुरवठा करण्याचा निर्णय जिल्हा प्रशासनाने घेतला असून जिल्ह्यातील टँकरग्रस्त गावांची संख्या ७४ वर पोहोचली आहे. सोबतच टंचाई काळात २६ नळ योजनांच्या विशेष दुरुस्तीलाही प्रशासनाने मान्यता दिली आहे.
यात शेगांव तालुक्यातील गायगांव बुद्रूक, जलंब, सिंदखेड राजा तालुक्यातील किनगांव राजा तसेच चिखली तालुक्यातील कोलारा येथे टंकरने पाणीपुरवठा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. जलंब येथील दहा हजार लोकसंख्येकरीता दोन टँकर मंजूर करण्यात आले असून दररोज हे टँकर एक लाख ३६ हजार ६८० लिटरचा पाणीपुरवठा करणार आहे. गायगाव बु. येतील १४०० लोकसंख्येकरीता एक टँकर मंजूर करण्यात आले आहे. कोलारा येथील चार हजार ६४० लोकसंख्येकरीता एक टँकर मंजूर करण्यात आले. हे टँकर दररोज पावणे दोन लाख लिटर पाणीपुरवठा करणार आहे. किनगाव राजासाठीही दोन टँकर मंजूर करण्यात आले आहे.
दरम्यान, २६ गावांसाठीच्या नळ योजनांच्या विशेष दुरुस्तीसाठी मान्यता देण्यात आली आहे. यामध्ये सिंदखेड राजा तालुक्यातील पिंपळगाव सोनारा, वाकद जहाँगीर, लोणार तालुक्यामधील सोमठाणा, टिटवी, पारडी, बोराखेडी, गुंधा, मातरखेड निजामपुर, मेहकर तालुक्यातील अंत्री देशमुख, सुकळी, बोरी, खामगांव तालुक्यातील जयपुर लांडे, कुंबेफळ, पोरज, हिंगणा कारेगाव, पळशी खु., पिंप्रि धनगर, नागापुर, रामनगर, माटरगाव गेरु, वझर, नांदुरा तालुक्यातील महाळूंगी, नायगाव, वळती बु.,चिखली तालुक्यातील किन्होळा, भानखेड, किन्ही सवडद या गावांसाठी नळ योजना विशेष दुरूस्तीची कामे मंजूर करण्यात आली आहे. या कामांसाठी निधीची तरतूद करण्यात आली आहेत. दरम्यान, चिखली तालुक्यातील सातगांव भुसारी, सिंदखेड राजा तालुक्यातील खैरव, गारखेड या गावांसाठी तात्पुरती पुरक नळ योजना मंजूर केली आहे.
संबंधीत ग्रामपंचायतीने वीज देयक भरलेले नसल्याने नळ योजना बंद असले तर अशा ग्रामपंचायतीने प्रथम थकीत वीज देयकाची रक्कम भरून वीज पुरवठा सुरू करावा, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.