मोताळ्यात घरे व दुकानांत शिरले पाणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 8, 2021 04:41 AM2021-09-08T04:41:49+5:302021-09-08T04:41:49+5:30
तालुक्यात ६ सप्टेंबरच्या संध्याकाळपासूनच दमदार पावसाने हजेरी लावली. रात्रीही संततधार पाऊस सुरू होता. त्यामुळे नदी-नाल्यांना पूर आला आहे. शहरातून ...
तालुक्यात ६ सप्टेंबरच्या संध्याकाळपासूनच दमदार पावसाने हजेरी लावली. रात्रीही संततधार पाऊस सुरू होता. त्यामुळे नदी-नाल्यांना पूर आला आहे. शहरातून जाणाऱ्या व नळगंगा नदीच्या उपनदीवरील पुलावरून पाणी वाहू लागल्याने शहरातील अनेक घरांत पाणी शिरले. त्यामुळे घरगुती साहित्य पाण्यात बुडाले तर शहरातील एका कॉम्प्लेक्समधील खालच्या मजल्यातील दुकाने पूर्णत: पाण्यात बुडाली आहेत. त्यामुळे दुकानदारांचेही मोठे नुकसान झाले आहे. श्री कन्स्ट्रक्शनमधील खालच्या मजल्यातील दुकानांमध्ये दोन ते तीन फुटांपर्यंत पाणी शिरले आहे. त्यामुळे यामध्ये असलेल्या गोडाऊनमधील मका, सोयाबीन पाण्यामध्ये बुडून खराब झाले आहे. तसेच यामधील बँका व दुकानांत पाणी शिरल्याने संगणकांसह इतर साहित्याचे तसेच दुकानदारांच्या सामानाचे खूप नुकसान झाले आहे. ग्रामीण भागातही अनेक घरांत पाणी शिरले आहे. तालुक्यातील अनेक शेतांतील पिके खरडून गेली आहेत. ६ सप्टेंबरपासून पावसाचा जोर असल्याने मोताळा शहरातील काही विजेचे खांब पडल्याने वीजपुरवठाही खंडित झाला असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
--नगरपंचायतीचे दुर्लक्ष--
पावसामुळे निर्माण झालेल्या आपत्कालीन परिस्थितीत नगरपंचायतीचा एकही कर्मचारी किंवा अधिकारी मदत कार्यासाठी आपद्ग्रस्त भागात फिरकला नाही. त्यामुळे नगरपंचायत प्रशासनाविरोधात रोष व्यक्त होत आहे. नुकसानीचे सर्वेक्षण करून आपद्ग्रस्तांना त्वरित मदत देण्याची मागणी स्थानिकांमधून होत आहे.