पावसाळ्यात पाणीटंचाई! ७७ गावात ८० टँकर, अवघा ५ टक्के पाणीसाठा
By ऑनलाइन लोकमत | Published: July 12, 2018 06:59 PM2018-07-12T18:59:27+5:302018-07-12T19:02:43+5:30
जिल्ह्यात ऐन पावसाळ्यात पाणी प्रश्न पेटला आहे. प्रकल्पातील जलसाठा हा अद्यापही तळाला असून सध्या प्रकल्पात अवघा 5.28 टक्के जलसाठा आहे.
बुलडाणा - पावसाळ्याचा दीड महिना उलटत आला असला तरी पावसाने जिल्ह्यात दमदार हजेरी लावली नाही. त्यामुळे ऐन पावसाळ्यात पाणी प्रश्न पेटला आहे. प्रकल्पातील जलसाठा हा अद्यापही तळाला असून सध्या प्रकल्पात अवघा 5.28 टक्के जलसाठा आहे. येत्या काळात दमदार पाऊस पडून प्रकल्प न भरल्यास ऑगस्ट नंतर शहरी भागातील साडेपाच लाख आणि ग्रामीण भागातील सुमारे १७ लाख नागरिकांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनू शकतो.
जिल्ह्यातील ७७ गावांची तहान सध्या ८० टँकरद्वारे भागवावी लागत आहे. जिल्ह्यात अद्याप जोरदार पाऊस झाला नसल्याने पावसाळ्यातही ग्रामस्थांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. जिल्ह्यात असलेलेल्या मोठे, मध्यम व लघू अशा एकूण ९१ प्रकल्पांचा संकल्पीत साठा हा ५३३.५६ दलघमी आहे. परंतु, यावर्षी पावसाळा सुरू झाल्यापासून एकही दमदार पाऊस झाला नसल्याने जिल्ह्यातील मोठ्या, मध्यम व लघु प्रकल्पात केवळ २८.१९ दलघमी जलसाठा आहे. जिल्ह्यातील नळगंगा (मोताळा), पेनटाकळी (मेहकर) व खडकपूर्णा (देऊळगाव राजा) या तीन मोठ्या प्रकल्पांमध्ये ८.४९ दलघमी म्हणजे ३.८१ टक्के जलसाठा आहे. जिल्ह्यात सात मध्यम प्रकल्प असून त्यामध्ये पलढग (मोताळा), ज्ञानगंगा, मस (खामगाव), कोराडी (मेहकर), मन, तोरणा (खामगाव), उतावळी (मेहकर) यांचा समावेश आहे. या मध्यम प्रकल्पांमध्ये १४.१० दलघमी म्हणजे १०.३६ टक्के जलसाठा आहे. तर एकूण लघु प्रकल्प ८१ असून यामध्ये ५.६० दलघमी म्हणजे ३.२० टक्के जलसाठा आहे. जिल्ह्यातील ७७ गावांमध्ये पाणीटंचाईची समस्या आहे. त्यामुळे या ७७ गावांमध्ये ८० टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे. काही ठिकाणी गावालगतच्या विहिरीत पाइपद्वारे टँकरमधील पाणी सोडण्यात येते. त्यानंतर गावातील महिला व ग्रामस्थांना त्या विहिरीतून पाणी काढून पाणी भरावे लागते. सध्या शेतातील कामे सुरू आहेत. मात्र, कामाच्या वेळेतही अनेक वेळेस गावातील नागरिकांना टँकरची वाट पहावी लागत असल्याचे चित्र आहे आहे.
* साडेचारशे गावे विहीर अधिग्रहणावर
जिल्ह्यात जोरदार पाऊस अद्याप झाला नसल्याने पावसाळ्यात पिण्याच्या पाण्याची समस्या जाणवत आहे. जिल्ह्यात ८० टँकर तर सुरू आहेतच. याशिवाय पाणीटंचाई निवारणार्थ विहीर अधिग्रहणही करण्यात आलेले आहे. जिल्ह्यात ४४२ गावांमध्ये ५२१ विहीर अधिग्रहण करण्यात आलेले आहे.
* गतवर्षीपेक्षा परिस्थिती गंभीर
गतवर्षी जिल्ह्यात पाणीटंचाई निर्माण झाली होती. मात्र, पावसाळ्याच्या दिवसात पाणीटंचाई दिसून आली नाही. गतवर्षी पेक्षा यावर्षीच्या पाणीटंचाईची परिस्थिती जरा गंभीर आहे. २०१७ मध्ये या दिवसात केवळ २९ गावात ३० टँकर सुरू होते आणि ४०३ गावांमध्ये ४९२ विहीर अधिग्रहण करण्यात आल्या होत्या. मात्र, यंदा ८० टँकर व ५२१ विहीर अधिग्रहण आहे.