नदीकाठच्या गावात पाणीटंचाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 4, 2017 12:36 AM2017-04-04T00:36:11+5:302017-04-04T00:36:11+5:30
खडकपूर्णा नदीपात्रात पाणी सोडण्यात यावे!
राहेरी : गेल्या वर्षीच्या तुलनेत या वर्षी जरी पावसाळा जास्त झाला असला, तरी एप्रिलच्या सुरुवातीला संपूर्ण नदी काठच्या गावाला भीषण पाणीटंचाई जाणवत आहे. खडकपूर्णा नदीपात्र मार्चच्या सुरुवातीलाच कोरडे पडले होते. हळूहळू पूर्ण पाणी नाहिसे झाले असता नदीकाठच्या गावाला भीषण पाणीटंचाई जाणवू लागली आहे.
अनेक नदीकाठच्या जवळपास ४० ग्रामपंचायतींनी पाणी सोडण्यात यावे, असे ठरावसुद्धा पाठविलेले आहेत. ग्रामपंचायतलासुद्धा पाणी पुरविण्यास नदीपात्रात पाणी नसल्यामुळे अपयश येत आहे. गावकऱ्यालासुद्धा त्रास सहन करावा लागतो. परिसरातील विहिरी पण कोरड्या पडत चालल्या आहेत. हातपंपसुद्धा बंद पडले आहेत. त्याचबरोबर गुरांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभा आहे. नदीकाठच्या गावातील शेतकऱ्यांनी हजारो हेक्टर भुईमूग, ऊस, कांदा लागवड केलेली आहे. परंतु संपूर्ण उन्हाळी भुईमूग, ऊस, कांदा शेतकऱ्यांच्या हातातून जाण्याच्या मार्गावर आहे. दरवर्षी उन्हाळ्यात पाणी सोडण्यात येत होते. यावर्षी खडकपूर्णा धरणाचे पाणी सोडण्यात आलेले नाही. परिसरातील शेतकऱ्यांचे असे म्हणणे आहे, की, खडकपूर्णा नदी पात्रात पाणी सोडायचे नसेल, तर आधी सूचना देण्यात यायला पाहिजे होत्या. तशा सूचना सुद्धा देण्यात आलेल्या नाही. खडकपूर्णा नदीपात्रात पाणी सोडण्यात आले नाही, तर हजारो हेक्टर वरील कांदा, ऊस, उन्हाळी भुईमूग या पिकांचे प्रचंड नुकसान होणार आहे. याला जबाबदार कोण? असा प्रश्न राहेरी बु. परिसरातील शेतकऱ्यांना पडला आहे.
----------
खडकपूर्णा नदीपात्रात शंभर टक्के पाणी सोडण्याच्या प्रयत्नात आहे. मात्र, राहेरी बु. येथील पुलाचे काम झाल्यानंतर ९ तारखेनंतर पाणी सुटणारच आहे.
- आ.डॉ. शशिकांत खेडेकर, सिंदखेड राजा.
----------
खडकपूर्णा नदीमध्ये धरणाचे पाणी लवकर सोडण्यात यावे. जवळपास ४० ग्रा.पं.मध्ये पिण्याच्या पाण्याची टंचाई जाणवत आहे. नदीला लवकर पाणी सोडले तर नागरिकांना त्रास सहन करावा लागणार नाही.
- मालतीबाई देशमुख, राहेरी बु.