मार्च अखेर बुलडाणा जिल्ह्यातील निम्म्या गावात भेडसावणार पाणीटंचाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 3, 2021 11:39 AM2021-03-03T11:39:57+5:302021-03-03T11:40:48+5:30
Water Scarcity News मार्च अखेर जिल्ह्यातील जवळपास निम्म्या गावात पाणीटंचाईची दाहकता वाढण्याची शक्यता आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
बुलडाणा: मार्च महिना लागताच जिल्ह्यात पाणीटंचाईची चाहूल लागली असून मार्च अखेर जिल्ह्यातील जवळपास निम्म्या गावात पाणीटंचाईची दाहकता वाढण्याची शक्यता आहे. वर्तमान स्थितीत एका गावात टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत असून आठ गावातील विहिरी अधिग्रहित करण्यात आल्या आहेत. या वर्षीचा पाणीटंचाई कृती आराखडा हा १६ कोटी ३ लाख ३२ हजार रुपयांचा आहे. जिल्ह्यातील १,२७२ आबाद गावांपैकी ६८७ गावात अर्थात ५२ टक्के गावात उन्हाळ्यात पाणीटंचाई निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यानुषंगाने जिल्हा प्रशासनाने नियोजन केेल आहे. संबंधित गावात जवळपास ९५६ उपाययोजना प्रस्तावित करण्यात आल्या आहेत. विंधन विहिरी घेणे, विहिरींचे अधिग्रहण, तात्पुरत्या पूरक नळयोजना कार्यान्वित करणे, टँकरद्वारे टंचाईग्रस्त गावांना पाणीपुरवठा करणे, विहीर खोलीकरणास प्राधान्य देणे, तसेच रखडलेल्या पाणीपुरवठा योजना पूर्णत्वास नेण्यास प्राधान्य देण्यात येत आहे. जिल्ह्यात टंचाई जाणवण्यास प्रारंभ झाला असून एका गावात टॅंकर सुरू झाले आहे.