पाणीटंचाई: महिलांचा खामगाव पालिकेवर मोर्चा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 12, 2019 02:28 PM2019-06-12T14:28:00+5:302019-06-12T14:28:46+5:30
मंगळवारी दुपारी १ वाजता भर उन्हात शंकर नगरातील महिला व बच्चे कंपनींनी घागर मोर्चा काढला होता.
लोकमत न्यूज नेटवर्क
खामगाव : शहरातील पाणीटंचाईचे निवारण करण्यात पालिका प्रशासनाला अपयश आल्याचे दिसून येते. खामगाव शहराला सध्या गेरू माटरगाव येथील ज्ञानगंगा प्रकल्पातून पाणीपुरवठा होत आहे. यावर्षी मागील तीन महिन्यापासून खामगाव शहरातील विविध भागात १२ ते १५ दिवसानंतर पाणीपुरवठा होत असल्याने नागरिक त्रासून गेले आहेत. भर उन्हात पाण्यासाठी महिला, मुले हातपंपावर पाणी भरताना दिसतात. पालिका प्रशासनातर्फे शिर्ला डॅमवरून पाणीपुरवठा करण्याचे नियोजन सुुरु आहे. मात्र एक महिन्यापेक्षा जास्त कालावधी उलटला तरी अद्याप खामगाव शहराचा पाणीपुरवठा सुरळीत होवू शकला नाही. खामगाव शहरातील काही भागात पालिकेची नळयोजना सुद्धा पोहचू शकली नाही. ़अशा भागात शहरातील सामाजिक कायकर्त्यांकडून टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. मात्र टँकरवर तहान भागवणे जिकरीचे झाले आहे. मंगळवारी दुपारी १ वाजता भर उन्हात शंकर नगरातील महिला व बच्चे कंपनींनी घागर मोर्चा काढला होता. पंधरा दिवसानंतर आमच्या भागात पाणी पुरवठा होत आहे. पालिका प्रशासनाला वारंवार लेखी निवेदन तथा तोंडी सांगूनही अद्याप या भागातील पाणीपुरवठा सुरुळीत होवू शकला नसल्याचे नागरिकांनी सांगितले.
कायमस्वरुपी उपाययोजनांची गरज
पाणीटंचाईची ाीषणता दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. सध्या खामगाव व शेगाव तालुक्यातील ६४ गावांना दररोज टँकरव्दारे पाणी पुरवठा करण्यात येत आहे. टँकरवर तहान भागत नसल्याने अनेक ठिकाणी खाजगी विहिरींचे अधिग्रहणही करण्यात आले आहे. गत ३ वर्षापासून सातत्याने बुलढाणा जिल्ह्यात कमी पाऊस होत आहे. मागील वर्षी तर जिल्ह्यात अत्यल्प पाऊस पडला. यामुळे धरणे भरली नाहीत. विहिरींना पुरेसे पाणी आले नाही. काही धरणात पाणी आले पण तेही कमी. खामगाव तालुक्यातील परिस्थिती तर अधिकच बिकट आहे. तालुक्यातील एक तलाव पुर्णत: भरला नव्हता. अनेक धरणात तर पूर्ण पावसाळ्यात थेंबभरही पाणी आले नाही. त्यामुळे तालुक्यात पावसाळ्यापासून पाण्याची टंचाई जाणवत आहे.