जलयुक्त शिवार कामाचा मंत्रालय स्तरावर आढावा
By admin | Published: March 24, 2016 02:51 AM2016-03-24T02:51:49+5:302016-03-24T02:51:49+5:30
जलसंधारण मंत्र्यांची ग्वाही; बुलडाणा जिल्हाला मिळणार वाढीव निधी.
बुलडाणा : जिल्ह्यातील जलयुक्त शिवार योजनेंतर्गत सुरू असलेली कामे राज्यातील इतर जिल्ह्यांच्या तुलनेत माघारलेली असून, सदर कामे प्राधान्यक्रमाने पूर्ण करण्यासाठी वाढीव निधी दिला जाईल. एवढेच नव्हे तर बुलडाणा जिल्ह्याच्या कामांसंदर्भात मंत्रालयीन स्तरावर जिल्ह्यातील सर्व लोकप्रतिनिधींच्या उपस्थित आढावा घेतला जाईल, अशी ग्वाही जलसंधारण मंत्री पंकजा मुंडे पालवे यांनी दिली. आ. हर्षवर्धन सपकाळ यांनी उपस्थित केलेल्या तारांकित प्रश्नाच्या अनुषंगाने त्यांनी बुधवारी विधानसभेत ही घोषणा केली. जिल्ह्यातील जलयुक्त शिवार योजनेच्या अनुषंगाने आ. हर्षवर्धन सपकाळ यांनी विधानसभेत तारांकित प्रश्न उपस्थित केला होता. सदर प्रश्न मांडताना आ. सपकाळ यांनी जिल्ह्यातील जलयुक्त शिवार योजनेची सद्यस्थिती विशद केली. जिल्हय़ाचा कृती आराखडा निश्चित करून त्यामध्ये २५ हजार ६३१ कामांचा समावेश आहे. त्यासाठी ४८९ कोटी २६ लाख रुपये विशेष तरतुदीची आवश्यकता आहे. प्रत्यक्षात मात्र बुलडाणा जिल्ह्यास आजमितीस अल्प तरतूद प्राप्त झालेली आहे. त्यापैकी ७0 कोटी ५१ लाख तरतूद प्रत्यक्षात खर्च झाली असून, ५६ कोटी ९८ लाख रुपयांच्या निधीतून मार्चअखेरीस होणार्या कामाचे नियोजन पूर्ण करण्यात आलेले आहे. प्रस्तावित करण्यात आलेल्या २५ हजार ६३१ कामांपैकी फक्त ५ हजार १८ कामे पूर्ण झाली आहेत. या प्रश्नावरील चर्चेत आमदार बोंद्रे, डॉ. शशिकांत खेडेकर, अँड. आकाश फुंडकर यांनीसुद्धा सक्रिय सहभाग घेत जलयुक्त शिवार योजनेबाबत आ. सपकाळ यांनी मांडलेल्या वस्तुस्थितीस दुजोरा दिला. दरम्यान सदर प्रश्नाच्या अनुषंगाने झालेल्या चर्चेस उत्तर देताना जलसंधारण मंत्री पंकजा मुंडे-पालवे यांनी जलयुक्त शिवार योजनेचा आराखडा तयार करताना शिफारस करण्यात आलेल्या अनावश्यक व बोगस कामांची चौकशीसुद्धा करण्यात येईल, अशी घोषणा त्यांनी केली. आ. सपकाळ यांनी केलेल्या सूचनेनुसार योजनेतील कामांमध्ये सुसूत्रता, लोकसहभाग, पारदर्शकता, गतिमानता वाढविण्यासाठी धोरण निश्चित करण्यात येईल व बुलडाणा जिल्ह्यातील सर्व लोकप्रतिनिधींच्या उपस्थितीत मंत्रालय पातळीवर लवकरच आढावा घेण्यात येईल, अशा त्या म्हणाल्या.