पावसाळ्यातही ८ गावांना ९ टँकरद्वारे पाणीपुरवठा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 2, 2021 05:13 AM2021-09-02T05:13:31+5:302021-09-02T05:13:31+5:30
वर्तमान स्थितीत बुलडाणा तालुक्यातील सहा गावांना सहा टँकरद्वारे, चिखली तालुक्यातील एका गावाला आणि मोताळा तालुक्यातील एका गावाला टँकरद्वारे पाणीपुरवठा ...
वर्तमान स्थितीत बुलडाणा तालुक्यातील सहा गावांना सहा टँकरद्वारे, चिखली तालुक्यातील एका गावाला आणि मोताळा तालुक्यातील एका गावाला टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे. बुलडाणा तालुक्यात ढासाळवाडी, हनवतखेड, सावळा, डोंगरखंडाळा, चौथा, सुंदरखेड या गावांना टँकरद्वारे पाणीपुरवठा होत आहे. या व्यतिरिक्त चिखली तालुक्यातील तांबुळवाडी-सैलानीनगरला आणि मोताला तालुक्यातील पोफळी गावाला दोन टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे. दरम्यान, उन्हाळ्यात जिल्ह्यातील ८२ गावांना ८४ टंकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत होता.
--६२ गावातील विहिरी अधिग्रहीत
ग्रामीण भागातील ६२ गावांतही पाणीटंचाई असून त्यासाठी ६७ विहिरींचे अधिग्रहण करण्यात आलेले आहे. त्यावरून जिल्ह्यात यावर्षी पावसाचे प्रमाण कमी असल्याचे निदर्शनात येते. जिल्हयातीेल पाच तालुक्यांतील पावसाची सरासरी ही अद्यापही ५० टक्क्यांच्यावर सरकलेली नाही. त्यामुळे यावर्षी पाणीटंचाईची तीव्रता डिसेंबर आधीपासूनच जाणवण्याची भीती व्यक्त होत आहे.
--अनुदानही प्रलंबित--
गेल्या उन्हाळ्यात टंचाई निवारणासाठी केलेल्या उपाययोजनांसाठी जवळपास ७ कोटी ७० लाख ९९ हजार रुपयांचा खर्च झाला होता. हे अनुदानही अद्याप पाणीटंचाई विभागाला मिळालेले नाही. त्यातच पावसाळ्यातही काही गावांमध्ये पाणीटंचाई असल्याचे चित्र आहे.