मेहकरात आठ दिवसांआड पाणीपुरवठा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 15, 2021 04:30 AM2021-02-15T04:30:40+5:302021-02-15T04:30:40+5:30
मेहकर शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या कोराडी प्रकल्पात मोठ्या प्रमाणावर जलसाठा उपलब्ध असतानाही नगरपालिकेच्या नियोजन शून्य कारभारामुळे नागरिकांना आठव्या दिवसाआड पाणीपुरवठा ...
मेहकर शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या कोराडी प्रकल्पात मोठ्या प्रमाणावर जलसाठा उपलब्ध असतानाही नगरपालिकेच्या नियोजन शून्य कारभारामुळे नागरिकांना आठव्या दिवसाआड पाणीपुरवठा करण्यात येत आहे. मेहकर शहराची लोकसंख्या दिवसेंदिवस वाढत आहे. २०११च्या जनगणनेनुसार शहराची लोकसंख्या ४५ हजार २४८ असून, आता ही संख्या पन्नास हजाराच्या वर पोहोचलेली आहे. ग्रामीण भागातील शिक्षक, कर्मचारी, शेतकरी वर्ग ही मोठ्या प्रमाणावर शहरात स्थलांतरित झाल्याने, शहरातील पायाभूत सुविधांवरही मोठ्या प्रमाणावर ताण पडत आहे. शहराला कोराडी प्रकल्प व अनिकटवरील खुल्या विहिरीवरून पाणीपुरवठा करण्यात येतो. कोराडी प्रकल्पात ७६ टक्के जलसाठा आहे. दरदिवशी पाण्याची ४.२ मिली मागणी असून, सध्या शहरात आठ दिवसांआड दरडोई ७० लीटरप्रमाणे दीड तास पाणीपुरवठा करण्यात येत आहे. कोराडी प्रकल्पामध्ये शहरासाठी प्रति वर्ष १.८६ दलघमी पाणी आरक्षित करण्यात येते. शहरात पिण्याच्या पाण्याची टंचाई भासू नये, म्हणून नगरपरिषदेने ७० हातपंप व २० वीजपंपही सुरू केले आहेत. वीजपुरवठा खंडित राहत असल्याने, पाणीपुरवठा करण्यात अडचणी येत असल्याचे सांगण्यात आले आहे. नगरपरिषद यांनी उन्हाळा काळात पाणीप्रश्न निर्माण होऊ नये, म्हणून योग्य पाऊल उचलावे, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
--कोट--
मेहकर शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या कोराडी प्रकल्पात ७० टक्के पाणी उपलब्ध आहे. त्यामुळे भविष्यात पाणीटंचाई निर्माण होणार नाही.
हाजी कासम गवळी, नगराध्यक्ष नगरपरिषद मेहकर