जुुन्याच पंपांवर पाणीपुरवठ्याचा डोलारा; बुलडाणा शहरात आठ दिवसाआड पाणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 2, 2018 04:52 PM2018-05-02T16:52:57+5:302018-05-02T16:52:57+5:30
बुलडाणा : जुन्याच मोटारपंपांवर नगर पालिकेच्या पाणीपुरवठा विभागाचा डोलारा उभा असल्यामुळे गेल्या दोन दशकांपासून बुलडाणेकरांच्या पाचवीला पुजलेली पाणीसमस्या कायम आहे
बुलडाणा : जुन्याच मोटारपंपांवर नगर पालिकेच्या पाणीपुरवठा विभागाचा डोलारा उभा असल्यामुळे गेल्या दोन दशकांपासून बुलडाणेकरांच्या पाचवीला पुजलेली पाणीसमस्या कायम आहे. सध्यस्थितीत येळगाव धरणात मुबलक पाणीसाठा असतानाही पंप नादुरुस्त असल्याने नागरिकांना आठ दिवसाआड पाणी मिळत आहे. पालिकेच्या ढिसाळ कारभारामुळे शहरवासी कमालीचे त्रस्त झाले आहेत. एक लाखाच्या वर लोकसंख्या असलेल्या बुलडाणा शहराला नजीकच्या येळगाव धरणावरुन पाणीपुरवठा होतो. गेल्या वर्षी परतीच्या पावसाने दमदार हजेरी लावल्याने येळगाव धरण हाऊसफुल्ल झाले. धरणात सध्या मुबलक पाणीसाठा उपलब्ध आहे. मात्र असे असतानाही शहरवासींना वेळेवर पाणी मिळत नाही. दररोज कुठल्या तरी वॉर्डातील लोकांची ओरड ऐकायला मिळते. गेल्या दोन -तीन दिवसांपासून नळाला आठ दिवसानंतर पाणी येत असल्याने पाणी कसे पुरवावे असा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यातच लग्नसराईचे दिवस सुरु असल्यामुळे पाण्याची गरज वाढली आहे. पालिकेच्या ढिसाळ कारभारामुळे ही परिस्थिती निर्माण झाली असून नागरिक त्रस्त झाल्याचे चित्र बघायला मिळत आहे.
नवीन पंप बसविणे आवश्यक
बुलडाणा शहराला पाणीपुरवठा करण्यासाठी पालिकेने १९९८ मध्ये येळगाव धरणावर २२५ हॉर्स पॉवर क्षमतेचे तीन मोटारपंप बसविलेले आहेत. त्यापैकी एक पंप स्टँडबाय ठेवून इतर दोन पंप सुरु असतात. जवळपास २० वर्षांपासून हे पंप सतत पाणी उपसण्याचे काम करीत आहेत. तांत्रिकदृष्ट्या विचार केल्यास एक पंप १० वर्ष चांगले काम करु शकतो. हे पंप जुनाट झाल्यामुळे सतत नादुुरुस्त असतात. सध्यस्थितीत दोन पंप बंद पडलेले असून केवळ एका पंपावर काम सुरु आहे. महिनाभरापूर्वीसुध्दा पंप बंद पडल्यामुळे अशीच परिस्थिती उदभवली होती. पाणीपुरवठा सुरळीत होण्यासाठी नवीन पंप बसविण्याची गरज आहे. यासाठी तीन कोटी रुपयांचा प्रस्ताव मंत्रालयाच्या पाणीपुरवठा विभागाकडे पाठविण्यात आल्याची माहिती पालिकेच्या पाणीपुरवठा अभियंत्यांनी दिली.
पाणीप्रश्नाचे राजकारण नको
गेल्या दोन दशकांपासून शहरातील पाणीसमस्या कायम आहे. पाणीप्रश्नावर पालिकेपासून ते विधानसभेच्या निवडणूका लढल्या गेल्या. विरोधकांनी पाणीसमस्येविरोधात रान पेटविले. मात्र आजतागायत पाणीप्रश्न सुटलेला नाही. राजकीय पुढाºयांनी केवळ गरजेपुरता पाणीप्रश्न हाताळला. राजकारण बाजुला ठेवून कायमस्वरुपी समस्या मार्गी लागावी याकरिता सामूहिक प्रयत्नांची गरज आहे. पाणीप्रश्नाचे केवळ राजकारण नको अशा भावना नागरिकांमधून ऐकायला मिळत आहेत.
मोटारपंप बंद पडल्यामुळे शहरात आठ दिवसाआड पाणीपुरवठा सुरु होता. आता पंप दुरुस्त करण्यात आला असून नागरिकांना पुर्ववत पाणी मिळेल.
- अजय व्यवहारे अभियंता, नगर पालिका बुलडाणा