सिंदखेड राजात दोन गावांना टँकरद्वारे पाणीपुरवठा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 24, 2021 04:33 AM2021-05-24T04:33:17+5:302021-05-24T04:33:17+5:30
टंचाई निवारणासाठी सध्या पंचायत समितीस्तरावरून उपाययोजना हाती घेण्यात आल्या आहेत. यामध्ये विहिरींचे अधिग्रहण, टँकरने पाणीपुरवठा, तात्पुरत्या स्वरूपातील नळयोजना, नळयोजना ...
टंचाई निवारणासाठी सध्या पंचायत समितीस्तरावरून उपाययोजना हाती घेण्यात आल्या आहेत. यामध्ये विहिरींचे अधिग्रहण, टँकरने पाणीपुरवठा, तात्पुरत्या स्वरूपातील नळयोजना, नळयोजना दुरुस्ती असे उपाय करण्यात येत आहेत. तालुक्यातील अनेक गावांत मेअखेरपर्यंत व त्यापुढे साठा होण्याइतपत पाऊस पडेपर्यंत पाणीटंचाईची तीव्रता जाणवण्याची शक्यता आहे. यासाठी तालुक्यातील २८ गावांत विहिरींचे अधिग्रहण केले जाणार आहे. त्यापैकी १६ गावांत विहिरींचे अधिग्रहण झाले असून, १२ ठिकाणी अधिग्रहणाची कार्यवाही सुरू आहे. दुसरीकडे सावरगाव माळ व दरेगाव या दोन गावात सध्या टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे.
विहीर अधिग्रहण होत असलेल्या गावांमध्ये भंडारी, बाळसमुद्र, सायाळ, शेलू, बुट्टा, माळ सावरगाव दोन, नाईकनगर, वसंतनगर, दत्तपूर, पि. सोनारा, राजेगाव, धांदरवडी दोन, शेंदुर्जन ४, बारलींगा, जागदरी, शिंदी, तांदुळवाडी, गोरेगाव, डावरगाव, वडळी, सोनोशी, खामगाव, कंडारी या गावांचा समावेश आहे.
--नळ योजनांसाठी ३१ लाखांचा निधी--
तालुक्यातील तात्पुरत्या पूरक नळ योजनेसाठी ३० लाख ७८ हजार रुपयांचा निधी प्राप्त झाला आहे. नळ योजना दुरुस्तीसाठी १६ लाख ३३ हजार रुपये मंजूर आहेत. दरम्यान, तालुक्यातील तात्पुरत्या नळ योजनेची चार कामे मंजूर असून त्यातील बट्टा येथील योजना प्रगतिपथावर आहे. लिंगा, आंबेवाडी, दरेगाव येथे ही योजना मंजूर आहे. विशेष नळयोजना दुरुस्तीसाठी आठ गावे समाविष्ट असून, त्यात पांगरखेड, दत्तपूर, लिंगा, खैरव, सायाला, रताळी, निमगाव वायाळ, राहेरी खुर्द या गावांचा समावेश आहे. यापैकी पांगारखेड येथील योजनेचे काम सुरू आहे. अनेक गावांमध्ये विंधन विहिरींची दुरुस्ती करण्यात येणार आहे. तालुक्यात पाणीटंचाईची दाहकता वाढणार नाही, यादृष्टीने सध्या पंचायत समिती स्तरावर यंत्रणा प्रयत्न करत असल्याचे सूत्रांनी स्पष्ट केले.