मेहकरमध्ये दहाव्या दिवशी पाणीपुरवठा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 19, 2019 02:55 PM2019-08-19T14:55:34+5:302019-08-19T14:55:41+5:30
कोराडी प्रकल्पाच्या जलसाठ्यात आतापर्यंत काहीच वाढ न झाल्याने पिण्याच्या पाण्याची समस्या बिकट स्वरूप धारण करीत असल्याचे चित्र निर्माण झाले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
मेहकर: शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या कोराडी प्रकल्पाच्या जलसाठ्यात आतापर्यंत काहीच वाढ न झाल्याने पिण्याच्या पाण्याची समस्या बिकट स्वरूप धारण करीत असल्याचे चित्र निर्माण झाले आहे. सध्या शहराला दहाव्या दिवशी पाणीपुरवठा करण्यात येतो. शासनाने तत्काळ वाढीव पाणीपुरवठा योजना तयार करून होणाºया समस्यांवर तोडगा काढावा, अशी मागणी जोर धरत आहे.
शहरात एकूण ७ हजार ९०० नळ कनेक्शनधारक आहेत. पावसाळा सुरू होऊन तीन महिने उलटले. मात्र शहराला पाणीपुरवठा करणाºया कोराडी प्रकल्पातील साठ्यात वाढ झाली नाही. शहराला मृत साठ्यातूनच पाणीपुरवठा करण्यात येत आहे. यावर्षी पावसाळ्यात साखरखेर्डा, लव्हाळा, मेरा आदी भागात समाधानकारक पाऊस न झाल्याने कोराडी प्रकल्पाच्या जलसाठ्यात काहीच वाढ झाली नाही.
येत्या एका महिन्यात पाऊस झाला नाही तर शहराला दहाव्या दिवशी होणारा पाणीपुरवठा १५ ते २० दिवसाआड जाण्याची शक्यता आहे. नगरपरिषद दरवर्षी या कोराडी प्रकल्पातून १.८६ दलघमी पाणी आरक्षित करते व शहराला दीड तास पाणीपुरवठा करण्यात येत आहे.
सामान्य लोकांजवळ पाणी साठवण्यासाठी काहीच सुविधा नसल्याने नगरपरिषदेने एक तास पाणीपुरवठा केल्यास आठव्या दिवशी पाणीपुरवठा होऊ शकतो. दुसरीकडे मेहकर उपविभागातील सावंगी माळी, सावंगी वीर, चायगाव आधी प्रकल्पातही पाणी नसल्याने येणाºया दिवसात ही समस्या गंभीर स्वरूप धारण करण्याची चिन्हे दिसत आहेत.
त्यासाठी शासनाने पेनटाकळी प्रकल्पातून पाण्याचे रिझर्वेशन काढून लिफ्ट इरिगेशनच्या माध्यमातून शहराला पाणीपुरवठा केला तर ही समस्या काही अंशी सुटण्यास मदत होऊ शकते. शासनाने तत्काळ भविष्यात होणाºया पाणी समस्यांकडे लक्ष देऊन वाढीव पाणीपुरवठा योजना तयार करावी, अशी मागणी जोर धरत आहे. दहा दिवसांपासून पाणीपुरवठा झाला नसल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत. शहरातील सर्व वॉर्डातील पाणीपुरवठा सुरळित करण्याची गरज आहे.
बुलडाण्यातील पाणीपुरवठा विस्कळित
बुलडाणा: बुलडाणा शहराला येळगाव धरणावरुन पाणीपुरवठा करण्यात येतो. मात्र गेल्या आठ दिवसांपासून शहरवासियांना पाणी मिळाले नसल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत.
यंदा पावसाळ्याच्या सुरवातीलाच येळगाव धरण ओव्हर फ्लो झाले. त्यामुळे बुलडाणेकरांची पिण्याच्या पाण्याची चिंता मिटली. मात्र गेल्या आठ दिवसांपासून शहरात पाणीपुरवठा झालेला नाही. पाणीपुरवठा कनेक्शनची महावितरणची तार जळाल्याने ही समस्या निर्माण झाल्याचे पालिकेच्या वतीने सांगण्यात आले. येळगाव धरणावरुन आजूबाजूच्या गावांनाही पाणीपुरवठा करण्यात येतो. विजेची समस्या निर्माण झाल्याने त्या गावांचाही पाणीपुरवठा प्रभावित झाला. ऐन पावसाळ्यात पाणीसमस्येला सामोरे जावे लागत असल्याने बुलडाणेकर त्रस्त झाले आहेत. तसेच ग्रामिण भागातही पाणीटंचाई निर्माण झाली. पाणीपुरवठा सुरळित करण्याची गरज आहे. सध्या येळगाव धरणात मुबलक पाणीसाठा उपलब्ध आहे. त्याद्वारे बुलडाणा व आजूबाजूच्या खेड्यांचीही तहान भागविली जावू शकते.