खामगावात होणार वाढीव दाबाने पाणीपुरवठा

By admin | Published: July 2, 2017 07:53 PM2017-07-02T19:53:49+5:302017-07-02T19:53:49+5:30

खामगाव : शहरात लवकरच वाढीव पाणीपुरवठा योजनेंतर्गत चारही झोन कार्यान्वित करण्यात येणार असून अतिरिक्त दाबाने पाणीपुरवठा होणार आहे.

Water supply will be increased in Khamgaon by increasing pressure | खामगावात होणार वाढीव दाबाने पाणीपुरवठा

खामगावात होणार वाढीव दाबाने पाणीपुरवठा

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
खामगाव : शहरात लवकरच वाढीव पाणीपुरवठा योजनेंतर्गत चारही झोन कार्यान्वित करण्यात येणार असून अतिरिक्त दाबाने पाणीपुरवठा होणार आहे. नवीन दोन्ही पाण्याच्या टाक्यांचे काम जवळपास पूर्णत्वास आल्याने पाणीपुरवठ्यातील मोठा अडसर दूर झाला आहे.
सद्यस्थितीत खामगाव शहराला गेरु माटरगाव येथील ज्ञानगंगा धरणातून पाणीपुरवठा केला जातो. या धरणातून पाणी पाईपलाईनद्वारा जळका भडंग येथील जलशुध्दीकरण केंद्रात आणून शुध्दीकरण केले जाते. त्यानंतर घाटपुरी रोडवरील पाण्याच्या टाकीत साठवून तेथून त्याचा शहराच्या अर्ध्या भागास पुरवठा केला जातो. तर उर्वरित शहराला पाणीपुरवठा करण्यासाठी घाटपुरी रोडवरील पाण्याच्या टाकीतून वामन नगरातील पाण्याच्या टाकीत पाणी सोडले जाते. नॅचरल ग्रॅव्हिटीद्वारा हे पाणी येथपर्यंत पोहचल्यानंतर टाकीत चढविले जाते. व शहराच्या अर्ध्या भागास त्याचा पुरवठा होतो.या प्रक्रियेत वेळेचा अपव्यय होत असल्याने घाटपुरी रोडवरील पाण्याच्या टाकीची साठवण क्षमता २१ लाख लिटर तर वामननगर टाकीची क्षमता १७ लाख लिटर एवढी आहे. साठवण क्षमता कमी असल्याने उपसा यंत्र फक्त १८ ते २० तास सुरु राहते व शहराला ६-७ दिवसाआड पाणीपुरवठा होत आहे. याकरिता शहरासाठी वाढीव पाणीपुरवठा योजना शिर्ला नेमाने येथील प्रकल्पातून मंजूर करण्यात आलेली आहे. सुमारे ७५ कोटी रुपयाच्या या योजनेचे काम सन २००९ पासून सुरु असून अजूनही पूर्ण झालेले नाही. या योजनेंतर्गत दोन नवीन पाण्याच्या टाक्यांचे बांधकाम करण्यात येत आहे. चार टाक्यांच्या माध्यमातून शहराचे चार भाग (झोन) करुन पाणीपुरवठा केला जाणार आहे. शहरात पाईपलाईन लिकेजेसची समस्या मोठी असल्याने या योजनेंतर्गत टाकलेल्या नवीन पाईपलाईनवरुन दोन झोनअंतर्गत पाणीपुरवठा सुध्दा अक्षयतृतियेलाच सुरु करण्यात आलेला आहे. तर आता दोन नवीन पाण्याच्या टाक्यांचे काम जवळपास पूर्णत्वास आले आहे. यात रावणटेकडी येथील पाण्याच्या टाकीचे काम १०० टक्के तर शेलोडी रोडवरील पाण्याच्या टाकीचे काम ९३ टक्के पूर्ण झाले आहे. त्यामुळे या टाक्यांच्या माध्यमातून लवकरच शहरात पाणीपुरवठा सुरु होईल. यामध्ये घाटपुरी येथील पाण्याच्या टाकीतून रावणटेकडीवरील टाकीत पाणी सोडले जावून त्याचा पुरवठा शहरातील काही भागात केला जाईल तर रावणटेकडीवरील टाकीतून शेलोडी रोडवरील टाकीत पाणी सोडून येथून काही भागात पाणीपुरवठा होणार आहे. गेरु माटरगाव व शिर्ला नेमाने दोन्ही धरणातून उपलब्धतेनुसार पाणीपुरवठा केला जाणार आहे. यामध्ये एकच व्हॉल्व्ह राहणार असल्याने पाण्याचा दाब वाढणार असून सध्याची कमी दाबाने पाणीपुरवठ्याची तक्रार दूर होणार आहे.तसेच १-२ दिवसाआड पाणीपुरवठा होवू शकेल. त्यामुळे शहरवासीयांना मोठा दिलासा मिळणार आहे.

 

Web Title: Water supply will be increased in Khamgaon by increasing pressure

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.